गुन्हेगाराला हरियाणा सरकारकडून एक दिवसाचा पॅरोल
वृत्तसंस्था/ पंचकूला
बलात्कार तसेच हत्येप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम एक दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. राम रहिमला 24 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या आजारी आईला भेटण्यासाठी पॅरोल देण्यात आला होता. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने प्रसारमाध्यमांना याचा सुगावा लागू दिला नव्हता. पॅरोलंनतर राम रहिम गुरुग्रामच्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वतःच्या आईला भेटला होता. त्यादरम्यान सुनारिया तुरुंगापासून गुरुग्रामच्या रुग्णालयापर्यंत चिलखती वाहनांमधून त्याला नेण्यात आले आणि परत आणले गेले आहे. समर्थकांना जमण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
राम रहिम 25 ऑगस्ट 2017 पासून रोहतकच्या तुरुंगात कैद आहे. साध्वींवर बलात्कार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहिमला दोषी ठरविण्यात आले होते. नियमांनुसारच पॅरोल देण्यात आल्याचा दावा मंत्री रणजीत सिंग चौताला यांनी म्हटले आहे. परंतु राम रहिमचे यापूर्वीच पॅरोलचे अर्ज फेटाळण्यात आले होते.
सुरक्षेत तीन तुकडय़ा
राम रहिम 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत स्वतःच्या आजारी आईसोबत होता. हरियाणा पोलिसांच्या तीन तुकडय़ा तेथे तैनात करण्यात आल्या होत्या. एका तुकडीत 80 ते 100 जवान होते. राम रहिम येण्यापूर्वी रुग्णालयातील एक मजला पूर्णपणे रिकामा करविण्यात आला होता.