सातारा बसस्थानक परिसरातील घटना
प्रतिनिधी/ सातारा
सातारा बसस्थानक परिसरातील मार्केटयार्ड, सेव्हनस्टार हे परिसरात संवेदनशील झाले आहेत. दि. 3 रोजी तलवारीने दोन युवकांवर हल्ला झाल्याचे समोर आले होते. मात्र, अनोळखी युवकांनी युवकाच्या गळय़ातील सोन्याची चैन चोरुन नेताना विरोध केल्याने शिवथरच्या दोन्ही युवकांवर गुप्तीने वार करुन लुटल्याची घटना युवकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी सेव्हनस्टार परिसरात दोन युवकांवर तलवार हल्ला झाल्याने त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ते युवक भयभीत झाल्याने त्यावेळी नेमका घटनाक्रम सांगत नव्हते. मात्र, दि. 4 रोजी विशाल उर्फ शुभम विश्वास यादव वय 20 रा. शिवथर, ता. सातारा याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास तक्रारदार युवक शुभम व त्याचा मित्र प्रणव अनंत साबळे (वय 20, दोघेही रा. शिवथर, ता. सातारा) हे सेव्हनस्टार समोर उभे होते. त्यावेळी अचानकपणे काळय़ा रंगाचा टी शर्ट घातलेले दोन अनोळखी युवक आले. त्यांनी गुप्तीचा धाक दाखवत या दोघांच्या गळय़ात सोन्याच्या चैन जबरदस्तीने काढून घेतल्या.
यावेळी शुभम व प्रणव यांनी या चोरटय़ा युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भोऱया रंगाचा टी शर्ट घातलेल्या अनोळखी युवकाने प्रणव साबळे याच्या चेहऱयावर गुप्तीने वार केला तर शुभम साबळेच्या हाताच्या बोटावर वार करुन दोघांनाही जखमी करुन अनोळखी युवकांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चैनी घेवून तेथून पोबारा केला.
अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे दोघेही युवक घाबरुन गेले. जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाल्याने त्यांना काही सुचत नव्हते. अशा अवस्थेत त्यांना कोणीतरी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे देखील ते घाबरलेले असल्याने नीटपणे काही सांगू शकत नव्हते. मात्र, त्यांच्या तक्रारीनंतर ही घटना भरदिवसा जबरी चोरीची असल्याचे समोर आले असून या आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.
बसस्थानक परिसरात जबरी चोऱया वाढल्या
बसस्थानक परिसरातील सेव्हनस्टार, मार्केटयार्ड परिसर रात्रीच्या वेळी असुरक्षित झाला असून दारु विक्री दुकानांच्या परिसरात अनेक भुरटे व सराईत चोरटे अनेकांना लुटत आहेत. मोबाईल चोरी पासून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. आता सेव्हनस्टार समोर भरदिवसा शिवथरच्या युवकांना लुटल्याची घटना पाहता या परिसरात पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज निर्माण झालीय.