पाकिस्तानची ड्रोनद्वारे आगळीक : सीमा सुरक्षा दलाकडून सीमेवर कारवाई
वृत्तसंसथा/ गुरदासपूर
पंजाबच्या गुरदासपूरमध्ये सीमेवर पाकिस्तानने नवी आगळीक करण्याचा प्रयत्न केला आहे. सीमाक्षेत्रातील स्लाच गावानजीक बीएसएफने सोमवारी सकाळी 11 ग्रेनेड हस्तगत केले आहेत. रविवारी रात्री या भागात पाकिस्तानी ड्रोन दिसून आल्यावर बीएसएफकडून गोळीबार करण्यात आला होता. यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतला होता. या घटनेनंतर पंजाब पोलीस आणि बीएसएफने पूर्ण भागात शोधमोहीम हाती घेतली आहे.
दीनानगर भागातील स्लाच या सीमावर्ती गावात रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानकडून आलेल्या एका ड्रोनवर बीएसएफच्या जवानांनी गोळय़ा झाडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सीमेवर शोधमोहीम हाती घेण्यात आली. धुक्याचा लाभ उचलून सीमेपलिकडून सातत्याने अमली पदार्थ तसेच शस्त्रास्त्रs पाठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शोधमोहिमेदरम्यान शेतामधून 11 पाकिस्तानी ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारेच हे ग्रेनेड पाठविण्यात आल्याचा संशय आहे.