क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेली चेन्नईन एफसी आणि बेंगलोर एफसी यांच्यातील रोमहर्षक लढत गोलशून्य बरोबरीत संपली. फातोर्डातील नेहरु स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने केलेल्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे चेन्नईन एफसीला काल विजयाने हुलकावणी दिली. सामनावीराचा रोख 50,000 पुरस्कार मिळविलेल्या गुरप्रीतने प्रामुख्याने दुसऱया सत्रात अभेद्य गोलरक्षण करताना बेंगलोरवर होणारे किमान तीन गोल वाचविले. या बरोबरीने दोन्ही संघांच्या बाद फेरी गाठण्याच्या अंधुक आशांना धक्का बसला आहे.
या निकालाने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. बेंगलोर एफसीचे आता 16 सामन्यांतून चार विजय, सात बरोबरी आणि पाच पराभवाने 19 गुण झाले आहेत. चेन्नईन एफसीचे 15 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी आणि पाच पराभवाने 17 गुण झाले आहेत. आता बेंगलोर एफसी संघ सहाव्या तर चेन्नईन एफसी आठव्या स्थानावर आहेत.
या सामन्यात चेन्नईन एफसीसाठी प्रथमच स्पेनचा मीडफिल्डर मान्यूएल लांजारोत खेळला. त्याच्या समावेशाने चेन्नईनच्या मध्यफळीत खऱया अर्थाने जान आली. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला गुरप्रीत सिंग धिल्लोने दोन वेळा चपळ गोलरक्षण करून संघावर होणारे गोल वाचविले. प्रथम इस्माईल गोन्साल्वीसने मारलेला फटका त्याने ब्लॉक केला व नंतर आलेल्या रिबाऊंडवर रहीम अलीने अगदी जवळून मारलेला फटका आपल्या ताब्यात घेतला.
तेराव्या मिनिटाला परत एकदा चेन्नईनने धोकादायक चाल रचली. मात्र मान्यूएल लांजारोतने दिलेल्या पासवर रिगन सिंग मारलेला फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला. बेंगलोरने आपली लढतीतील पहिली धोकादायक चाल 34व्या मिनिटाला रचली.
यावेळी एरीक पार्तालू आणि हरमनज्योत खाब्राने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर सुनील छेत्रीने अगदी जवळून हाणलेला फटका बचावपटू इली साबियाने ब्लॉक करून बाहेर टाकला. त्यानंतर बेंगलोरच्या क्लिटॉन सिल्वाने घेतलेली फिकीक चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथने
अडविली.
दुसऱया सत्रातील खेळावर बहुतांश चेन्नईन एफसीचे वर्चस्व आढळून आले. बेंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग विरूद्ध चेन्नईन अशीच झुंज दिसून आली. प्रथम 59व्या मिनिटाला इस्माईल गोन्साल्वीसच्या पासवर जर्मनप्रीत सिंगने हाणलेला फटका गुरप्रीत सिंग चपळ गोलरक्षण करून अडविला. लगेच दोन मिनिटांनी व नंतर लालियानझुआला छांगटेने हाणलेले फटके गुरप्रीत सिंगने लिलया अडविले. शेवटच्या क्षणी मेमो मौराचा फ्रिकीकवरील फटका गुरप्रीत सिंगने पंच करून कॉर्नरसाठी टाकून बेंगलोरला संभाव्य पराभवापासून वाचविले.