वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष संघाचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू व महिला फुटबॉल संघातील मिडफिल्डर संजू यादव यांची 2019-20 या मोसमातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या पुररस्कारांसाठी निवड केली असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने शुक्रवारी जाहीर केले.
गुरप्रीतची हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय सुब्रता पॉलनंतर हा पुरस्कार मिळविणारा तो दुसरा गोलरक्षक आहे. 2009 मध्ये सुब्रता पॉलने हा पुरस्कार मिळविला होता. इंडियन सुपर लीग आणि आय लीग क्लबच्या प्रशिक्षकांनी केलेल्या मतदानाच्या आधारे गुरप्रीतची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘एका ठरावीक बिंदूपर्यंत पोचण्याची माझी इच्छा होती आणि हा पुरस्कार आपल्यालाही मिळावा असे दीर्घकाळापासून वाटत होते. ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. सुनील चेत्रीने अनेकदा हा पुरस्कार पटकावला, तेव्हा आपण हा पुरस्कार मिळविण्यायोग्य केव्हा होणार, असे विचार मनात यायचे. इथवर पोहोचण्यासाठी मला एआयएफएफसह अनेकांनी निरंतर पाठिंबा दिला आणि साहय़ही केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे,’ अशा भावना गुरप्रीतने व्यक्त केल्या.
‘दोहामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धचा महत्त्वाचा सामना आम्ही अनिर्णीत राखला, आयएसएलच्या मागील आवृत्तीत आम्ही एकही सामना गमविला नाही आणि गोल्डन ग्लव्ह पुरस्कार जिंकणे या गोष्टी साध्य करणे संघाच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हते,’ असेही तो म्हणाला. 28 वर्षीय गुरप्रीतला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महिलांमध्ये संजू यादव सर्वोत्तम
गेल्या मोसमात चमकदार प्रदर्शन केल्यामुळे राष्ट्रीय महिला संघातील मिडफिल्डर संजू यादव हिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रतनबाला देवीने वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला फुटबॉलपटू पुरस्कार जिंकला. राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका मेमॉल रॉकी यांनी एआयएफएफचे तांत्रिक संचालक इसाक दोरु यांच्याशी चर्चा करून या दोघींची पुरस्कारासाठी निवड केली
आहे.
‘माझ्यासाठी हा मोठा माईलस्टोन आहे. गेली काही वर्षे आम्ही कठोर परिश्रम घेतले आहेत. हा पुरस्कार म्हणजे त्या परिश्रमाचेच फळ आहे. अनुभवासाठी आणि सुधारणा व्हावी यासाठी एआयएफएफने आम्हाला भरपूर संधी दिली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांची खूप मोलाची मदत झाली असून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये लागणारी कणखरता मिळविण्यास त्याचा खूप उपयोग झाला आहे. मेमॉल मॅडमनीही खूप मोलाची संधी दिली असल्याने मी त्यांचीही आभारी आहे,’ अशा भावना संजूने व्यक्त केल्या.
मिडफिल्डर अनिरुद्ध थापा याची वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली. याशिवाय सर्वोत्तम रेफरीचा पुरस्कार मणिपूरच्या एल. अजित कुमार मीतेई यांना मिळाला तर तामिळनाडूच्या पी. वैरामुथू यांची सर्वोत्तम साहाय्यक रेफरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.