प्रतिनिधी/ वडूज
गुरसाळे (ता. खटाव) येथे सोमेश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पुणे महापौर केसरी पै. भारत मदने विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. बालारफिक शेख अशी कुस्ती घेण्यात आली. या रोमहर्षक लढतीमध्ये बालारफिकने पोकळ घिस्सा डावावर भारत मदनेला चितपट करत मानाची सोमेश्वर केसरी किताबाची चांदीची गदा व रोख रक्कम 1 लाख 51 हजार रुपये बक्षीस पटकावले.
तर प्रशांत शिंदेने अरुण बोगार्डेवर ढाक डावावर विजय संपादन केला. सागर तामखडेने सोन्या सोनटक्केवर मात केली. मनोज कदमने रणवीर पाटीलवर मोळी डावावर विजय मिळवला. सतपाल सोनटक्के, पृथ्वीराज पाटील, आदिनाथ लोखंडे, संग्राम सूर्यवंशी, कन्हेय्या माने यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करीत प्रेक्षकांची मने जिंकली. मैदानास रणजित देशमुख, संदिप मांडवे, नंदकुमार मोरे, धनंजय क्षीरसागर आदि मान्यवरांनी भेट दिली.
तुकाराम पाटील, रावसाहेब मगर, मारुती जाधव गुरुजी, अर्जुन पाटील, शहाजी पवार, राजेंद्र शिंदे, श्रीमंत जाधव, विकास उर्फ राजू जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. उमेश पाटील व युवराज केचे यांनी मैदानाचे उत्कृष्ट समालोचन केले. ग्रामपंचायत, सोसायटी, यात्रा कमिटी व गुरसाळे ग्रामस्थ यांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले.