वार्ताहर/ साखरपा
रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावानजीक गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारी पिकअप गाडी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली तसेच पोलीस स्थानकात गाडी व पिकअप चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
हिंदूचा पवित्र सण असलेला वसूबारस या सणाच्या दिवशी ही गाडी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. त्यांनी साखरपा पोलीस स्थानक दूरक्षेत्राचे अंमलदार संजय मारळकर यांच्याकडे आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी निवेदन दिले. रात्री उशिरा साखरपा पोलीस स्थानकात पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. पिकअप बोलेरोमध्ये एक गाय, 1 वासरू आणि 1 जर्सी गाय होती. ही गाडी मोहन मधुकर सोने (शाहूवाडी) हा चालवत होता. देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक जाधव यांनी साखरपा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या घटनेची माहिती घेतली तसेच हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रणित दुधाने, सागर कदम, बंटी कनावजे, सुरज शिर्के, गणेश गायकवाड, चंद्रकांत राऊळ, सागर विचारे, भाई पवार, संतोष केळकर, सौरभ वैद्य, साहिल दुधाने, ओंकार साळुंखे, निखिल भोसले, यश शिर्के, बाळा काबदुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.