ऑनलाईन टीम / गुरूदासपूर :
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील चंदू वडाळा चौकीजवळ पाकिस्तानी तस्कर आणि बीएसएफ जवानांमध्ये शुक्रवारी पहाटे चकमक उडाली. यात बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झाला. या जवानाला उपचारासाठी अमृतसर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, बीएसएफने घटनास्थळावरुन 47 किलोहून अधिक हेरॉईन, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करत पाकिस्तानी तस्करांचा डाव उधळून लावला.
बीएसएफचे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल ज्ञानसिंग यादव यांना चंदू वडाळा चौकीजवळ पाकिस्तानी तस्करांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यावेळी बीएसएफ जवानांनी तात्काळ पाकिस्तानी तस्करांच्या दिशेने गोळीबार केला. पाकिस्तानी तस्करांनीही प्रत्युत्तर देत जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारादरम्यान हेडकॉन्स्टेबल ज्ञानसिंह यादव यांच्या डोक्मयावर आणि हातावर गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर कॉन्स्टेबल राजू बिस्वास यांनी पुढाकार घेऊन तस्करांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर तस्करांनी घटनास्थळावरून पळ काढला.
तस्कर पळून गेल्यानंतर बीएसएफकडून घटनास्थळी शोध घेण्यात आला. घटनास्थळावरुन बीएसएफने हेरॉईनची 47 पाकिटे, अफूची 7 पाकिटे, 2 पिस्तुल एके-47 ची 4 मॅगझीन व 74 राउंड, .3 एमएम पिस्तुलाच्या 44 राउंड आणि इटली मेड बेरेटा पिस्तुलाची 12 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, हेडकॉन्स्टेबल यादव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अमृतसरला हलविण्यात आले आहे.