शहर, उपनगरांमधील 15 जणांचा समावेश
बेळगाव : गुरुवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये बेळगाव शहर व उपनगरांमधील 15 जणांचा समावेश असून सक्रिय रुग्णांची संख्या 251 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 470 हून अधिक झाली आहे. त्यापैकी 26 हजार 865 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून स्वॅब तपासणी वाढविली असून 3 हजार 79 हून अधिक जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
गुरुवारी गणेशपूर, रामतीर्थनगर, हनुमाननगर, टिळकवाडी, वडगाव, राणी चन्नम्मानगर, नानावाडी, श्रीनगर, शिवबसवनगर, दूरदर्शननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर बेनकनहळ्ळी येथील चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी विद्यार्थी तसेच परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 251 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या तिघा जणांना घरी पाठविण्यात आले. आरोग्य विभागाने लसीकरणाची मोहीम तीव्र केली असून अद्याप 33 हजार 435 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.