प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनावर परिणामकारकपणे नियंत्रण आणण्यासाठी ‘मास्क डे’ चे आचरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवार दि. 18 रोजी संपूर्ण राज्यभरात मास्क डे आचरण करण्यात येईल. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता आपण विधानसौधपासून 1 कि. मी. पर्यंत पायी चालत जाणार आहे. राज्यभरात जिल्हा केंद्रांमध्येही याचे आचरण करण्यात येणार असून सामाजिक अंतर आणि मास्क परिधान करून जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेंगळूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यासह मंत्री व अधिकाऱयांशी सोमवारी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा यांनी बेंगळूरमध्ये एकूण 697 प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यापैकी 330 प्रकरणांतील सक्रिय रुग्ण आहेत. बेंगळूरसह आजूबाजूच्या जिल्हय़ांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी विशेष कृतीदल स्थापन करण्याची सूचना दिली आहे, असे ते म्हणाले.
राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे 7100 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरच्या मार्गसूचीमधील उल्लेखापेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धत आणि चिकित्सा दर निश्चित करण्यासंबंधी देखील लवकरच मार्गसूची प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यात कोरोना रुग्णसंख्येपैकी केवळ 1.2 टक्के मृत्यूदर आहे. त्यामुळे जनतेने अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. जनतेने मास्क, सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.
राज्यात लॉकडाऊन वाढविणार नाही
राज्यात लॉकडाऊन वाढविणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यावेळी आपण कर्नाटकातील कोरोनासंदर्भातील माहिती देणार आहे. शिवाय राज्यात लॉकडाऊन वाढविणार नसल्याचे पंतप्रधानांना सांगणार आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले. रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांनी राज्यात लॉकडाऊन वाढविणार नसल्याचे सांगितले होते.