प्रतिनिधी / पणजी :
गुरुवारी कोरोनाचे 215 नवे पॉझिटीव्ह रुग्ण सापडले असून 221 जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे काल 3 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 43 वर पोहोचला आहे. 4832 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. सध्या राज्यात 1657 सक्रीय कोरोनाबाधित असून आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 5704 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत 4005 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राजधानी पणजीत कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्यांची संख्या 76 झाली आहे.
आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार 39 संशयित रुग्णांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून विविध रेसिडेन्सी-हॉटेलमध्ये 84 जणांना क्वॉरंटाईन केले आहे. काल दिवसभरात 1430 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले तर 1779 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 215 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून गेल्या दोन -तीन दिवसात पाठवलेल्या 4832 नमुन्यांचा अहवाल अजून येणे बाकी आहे.
विविध आरोग्य केंद्रातील नोंदणीनुसार कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. सांखळी 43, म्हापसा 43, पणजी 76, कांदोळी 39, कोलवाळ 54, चिंबल 66, मडगाव 107, वास्को 391 , बाळ्ळी 38, कुठ्ठाळी 343, लोटली 40, धारबांदोडा 32, फोंडा 94, नावेली 27, शिरोडा 14, सांगे 5, केपे 8, मडकई 18, कुडतरी 31, कासावली 18, कुडचडे 12, पर्वरी 19, मये 5, शिवोली 12, खोर्ली 15, हळदोणा 10, पेडणे 6, वाळपई 9, कासारवर्णे 6, बेतकी 7, डिचोली 4. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 61 प्रवाशांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
राजधानी पणजी कोविडग्रस्त होऊ लागली असून काल गुरुवारी विविध भागात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मळा 6, रायबंदर, मार्केट-पणजी, सातईनेज, आमिना बिल्डींग, चिंचोळे येथे प्रत्येकी 1 मिळून 10 जण सापडले आहेत. पणजीचे मासळी मार्केट व तेथील इमारत कोविडचा अड्डाच (हॉटस्पॉट) बनला असून तेथे आतापर्यंत 16 रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे पणजीवासियांची डोकेदुखी वाढली असून येथे वास्तव्य करणाऱयांची पणजी मनपाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे तेथे कोणतीही स्वच्छता नाही उलट गलिच्छता वाढली असून प्रसाधनगृहे सामायिक आहेत. येथे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खाते, मनपा पोलिसांनी दखल घेवून कारवाई करावी असे पणजीकरांचे म्हणणे आहे.