प्रतिनिधी/ सातारा
सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूल या इंग्रजी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. त्याचप्रमाणे शाळेने सामाजिक बांधीलकीची जाणीव विद्यार्थ्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून ‘एक मुठ धान्य’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गहु, ज्वारी, तांदुळ हे धान्य शाळेमध्ये विद्यार्थी एकत्र जमा करतात, सदर जमा झालेले धान्य अनाथालय, वृध्दाश्रम, विशेष मुलांच्या शाळा तसेच गरजू व्यक्तींना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात येते.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत सातारा येथील दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेतील गरजू 40 सदस्यांना 600 किलो धान्याच्या माध्यमातून गहु, ज्वारी, तांदळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना गुरूकुल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले, शाळेच्या विद्यार्थ्यांनी जमवलेले धान्य विद्यार्थ्यांच्या हस्ते देताना विद्यार्थ्यांच्यात सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी कायमच आमचे सहकार्य राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, मुख्याध्यापिका शिला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, माध्यमिक विभागप्रमुख सोनाली तांबोळी, प्रोजेक्ट कमिटी प्रमुख स्वाती फणसे व गुरूकुलचे विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते दिव्यांग संस्थेच्या सदस्यांना धान्य वाटप प्रसंगी राजेंद्र चोरगे, मुख्याध्यापिका व इतर.