प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत कोरोना रुग्णांची संख्या घटती आहे. गुरूवारी शहर व उपनगरांतील 6 व ग्रामीण भागातील 3 असे केवळ 9 रुग्ण आढळून आले असून बेळगाव येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. तर जिह्यातील 44 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 858 इतकी झाली आहे. तर मृतांचा सरकारी आकडा 335 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 24 हजार 8 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या वेगवेगळय़ा इस्पितळात 515 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
बसुर्ते, हिरेबागेवाडी, सोनोली, हनुमाननगर, शाहूनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, वडगाव परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आणखी 1448 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. अद्याप 25 हजार 895 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. 29 हजार 336 जणांनी 14 दिवसांचे होमकेअर संपविले आहे.
आतापर्यंत 2 लाख 29 हजार 636 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. 2 लाख 19 हजार 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बेळगाव शहर व उपनगरांतील रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे बेळगावकरांना तुर्त दिलासा मिळाला असला तरी हिवाळय़ात काळजी घेतली नाही तर रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.