राज्यातील रुग्ण संख्या 181 : बुधवारी 6 जणांना संसर्ग
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच राज्यात आणखी एक बळी गेला आहे. गुलबर्गा येथील आणखी एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 5 वर पोहोचला आहे. याच दरम्यान 6 नवे रुग्ण आढळून आले असून बुधवारी संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 181 वर पोहोचली आहे. भटकळमध्ये एका गर्भवती महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात बुधवारी नवे रुग्ण कमी आढळून आले असले तरी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने गुलबर्गा जिल्हा प्रशासन हादरले आहे. 10 मार्च रोजी गुलबर्ग्यातील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा देशातील कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. यापाठोपाठ 65 वर्षीय आणखी एका वृद्धाला कोरोना झाल्याचे मंगळवारी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. रात्रीच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. सदर रुग्णाला दाखल करून घेतल्यानंतर इस्पितळाने याबाबतची माहिती आरोग्य खाते आणि जिल्हा प्रशासनाला दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे तो दाखल झालेले इस्पितळ बंद करण्यात आले आहे. तसेच वृद्धावर उपचार केलेले डॉक्टर, परिचारिकांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर वृद्ध 6 मार्च रोजी खासगी इस्पितळात दाखल झाला होता. नंतर त्याला ईएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तो कोणत्याही पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला नव्हता. दिल्ली किंवा विदेश दौराही त्याने केला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी गुलबर्ग्यात 2 आणि कारवार, चिक्कबळ्ळापूर, मंडय़ा बेंगळूरमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळून आले. गुलबर्ग्यात 72 वर्षीय वृध्देला त्याच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंडय़ा जिल्हय़ात 35 वर्षीय महिला दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तिलाही संसर्ग झाला आहे. चिक्कबळ्ळापूरमध्ये 23 वर्षीय युवक आणि बेंगळूर शहर जिल्हय़ात 27 वर्षीय महिलेला दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर संसर्ग झाला आहे.