21 जुलैला आयसीआयसीआय बँकेत्tढन 1.20 कोटीचे फसवणूक प्रकरण
प्रतिनिधी / मडगाव
आयसीआयसीआय बँकच्या आर्लेम शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक तथा संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायालयात अंशतः सुनावणी झाली. पुढील सुनावणी आता 21 जुलै रोजी होणार असल्याचे न्यायायलाने निश्चित केले.
मंगळवारी दुपारी न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा अर्जदार गुल्शन गुसाई याच्यावतीने त्याचे वकील राजीव गोम्स न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी न्यायालयात गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आपला युक्तिवाद केला. मायणा कुडतरी पोलिसांच्यावतीने सरकारी वकील डी. कोरगावकर उपस्थित होते.
पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार असून त्यावेळी हस्तक्षेप करणाऱया याचिकादारांचे म्हणणे न्यायालय ऐकून घेण्याची शक्यता आहे.
संशयित अर्जदार गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी कुडतरी पोलिसांच्या व्यतिरिक्त आणखी चारजणांनी न्यायालयात अर्ज केलेले आहेत हे विशेष.
ज्या आयसीआयसीआय बँकेत गुल्शन गुसाई काम करीत होता त्या बँकेनेही गुल्शन गुसाईच्या विरोधात न्यायालयात यापूर्वीच अर्ज केला आहे आणि न्यायालयाने या बँकेला गुल्शन याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
1.20 कोटीची अफरातफर
9 जुलै 2020 रोजी या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस याच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली तेव्हा आणखी चारजणांनी संशयित गुल्शन गुसाई याच्या विरोधात हस्तक्षेप (इंटरवेन्शन) करणाऱया याचिका सादर केल्या होत्या.
पोलीस तक्रारीनुसार मडगाव परिसरात राहणाऱया पै नावाच्या एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या एकूण रकमेपैकी या प्रकरणातील संशयितानी सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
जाणीवपूर्वक फसवणूक करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे, कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संबंधीत प्राधिकरणाकडे सादर करणे यासारखे आरोप संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्यावर आहेत.