वाहनासह पळालेल्या चालकाला पोळे चेकनाक्यावर पकडले
प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार महामार्ग सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनलेला असून बऱयाच वेळा भटकी जनावरे या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा दावा होत असताना गुळे येथे 26 रोजी मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या जनावरांना एका भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे 11 जनावरांचा जागीच बळी जाण्याची दुर्दैवी घटना घडली.
या ठिकाणी एकूण 15 गुरे होती. त्यातील 2 गुरे आणि 1 वासरू गंभीर जखमी झाले आहे. गायीच्या वासरावर काणकोणच्या जनावरांच्या दवाखान्यात डॉ. अनीषा पिन्हेरो यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. मागच्या आठवडय़ात अशाच प्रकारे मनोहर पर्रीकर बगलमार्गावर दोन गुरांचा बळी गेला होता. आता तरी लोकांनी आपल्या गुरांना रस्त्यावर सोडू नये अशा प्रतिक्रिया या भागातून व्यक्त होत आहेत. बेफाम सुटलेल्या सदर वाहनाच्या चालकाने कसलीच दयामाया न दाखविता अपघात करून पळ काढला असला, तरी काणकोणच्या पोलिसांनी पोळे चेकनाक्यावर सदर वाहन पकडले. गुळे येथील रस्त्यावर तडफडत मेलेल्या गुरांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली होती अशी माहिती या भागातील स्थानिक नागरिकांनी दिली. या सर्व मृत जनावरांना काणकोणच्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गुळे येथे दफन केले. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.