वार्ताहर/ गुहागर
गुहागरचा प्रवास सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बंद असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम भर पावसाळ्यात सुरु
झाल्याने कित्येक गावांना वळसा मारुन होणारा प्रवास ‘काखेत कळसा नि गावाला वळसा’ ठरत आहे. त्यातच हे रस्ते कच्चे असल्याने त्यावर वाहने घसरून विशेष करुन दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याचे समोर येत आहे.
गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात करताना ठेकेदाराने दोन्ही बाजूंनी रस्ता उकरुन त्याच्या एका बाजूने रुंदीकरण केले. मात्र उकरलेली दुसरी बाजू तशीच ठेवली. त्यातच गेले तीन महिने लॉकडाऊन असल्याने हे रुंदीकरण बंद पडले. त्यामुळे रुंदीकरण रखडले. मात्र भर पावसाळ्यात या रुंदीकरणाला सुरुवात झाली आणि लाल मातीचा चिखल होऊन रस्ता निसरडा झाला. त्यातच महामार्गाला जोडणारे अंतर्गत गावांचे रस्ते समांतर नसल्याने वाहनांना चढ-उतार करणे, वाहने घसरणे असे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण वेगळ्याच वादाच्या भोवऱयात सापडले आहे.
यात कमी म्हणून की काय सध्या गुहागरचा प्रवास खूपच डोकेदुखी ठरला आहे. देवघरच्या पुढे गुहागरच्या दिशेने रस्ता रुंदीकरण सुरु झाल्याने वाहतुकीची कोंडी नको म्हणून झोंबडी फाटय़ानजीक ब्रॅकेट लावून खासगी वाहनांची वाहतूक झोंबडी फाटामार्गे काळसूरकौंढर, वेळंब व्हाया शृंगारतळी अशी करण्यात आली आहे. त्यामुळे झोंबडी फाटय़ापासूनच वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांवरील वाहतुकीला सामोरे जावे लागत आहे. पुढे गुहागरला जाण्यासाठी वाहनचालकांच्या मागे साडेसातीच लागली आहे. मोडकाघर पुलाचे काम सुरु असल्याने शृंगारतळी-पालपेणे-रानवी फाटय़ामार्गे असा लांब पल्ल्याचा 15 कि. मी.चा वाढीव मार्ग वाहतुकीसाठी आहे.
मात्र वेळ व पैशाची बचत करण्यासाठी अनेकांनी गुहागरला
जाण्यासाठी दोन पर्यायी कच्चे लाल मातीचे रस्ते निवडले. यातील एक रस्ता हा पाटपन्हाळे बसथांब्यापुढील उजव्या बाजूने जातो, तर दुसरा मोडकाघर पुलाच्यापूर्वी काही अंतरावरील उजव्या बाजूने जातो. हे दोन्ही रस्ते लाल मातीचे कच्चे व निमुळते असून ते वरवेली गावातून बाहेर पडतात व मोडकाघरला येऊन मिळतात. हे दोन्ही रस्ते सध्या पावसाळ्यात धोकादायक बनले आहेत. रस्त्यावर लाल मातीचा चिखल, खड्डे, दोन्ही बाजूंनी झाडे, घनदाट जंगल व वन्यप्राण्यांचा मुक्त संचार त्यातच दुचाकीस्वारांची घसरगुंडी होत असल्याने अपघातही वाढले आहेत. त्यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीला त्रासदायक ठरले आहेत.
मोडकाघर पूल दुरुस्ती कासवगतीने
मोडकाघर पूल जुनअखेर पूर्ण होईल असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले होते. मात्र या पुलाची पाहणी केली असता अद्याप पुलाच्या तळाच्या भिंतीही बांधून झालेल्या नाहीत. तसेच पावसाळा सुरु झाल्याने व हा धरणाच्या जलाशयाचा भाग असल्याने बांधकामात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी, जगबुडीसारख्या नदीवर पुलाचे छत रेडीमेड टाकण्यात आले आहेत. मात्र मोडकाघर पुलाचे छत पूर्णतः बांधण्यात येणार असल्याने या पुलाच्या उभारणीला खूपच उशीर होणार असल्याचे यावरुन स्पष्ट होत