दहा ऑक्सिजन बेडना तत्वतः मान्यता
प्रतिनिधी/ गुहागर
कोरोना प्रादुर्भावामध्ये तालुक्यातील कोविड बाधित रूग्णांना सेवा देण्यासाठी 108 रूग्णवाहिका अपुरी पडत होती. गुहागरवासीयांच्या मागणीनुसार आमदार भास्कर जाधव यांनी तालुक्यासाठी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून 15 लाख 50 हजार रूपये खर्च करून नव्या रूग्णवाहिकेचे गुरूवारी लोकार्पण केले. ऑक्सिजन सुविधेसह सुस्सज अशा या रूग्णवाहिकेमुळे आता या तालुक्यासाठी दोन रूग्णवाहिका जनतेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
आमदार जाधव यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व स्वतः रूग्णवाहिका चालवून लोकार्पण केले. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार जाधव यांनी पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी ही रूग्णवाहिका जनतेच्या सेवेकरिता आजपासून सुपूर्द केली असल्याचे सांगितले.
डीएम एंटरप्राईजेस एजन्सीच्या कारभारावर ताशेरे
वेळणेश्वर कोविड केअर सेंटरमधील कचऱयाविषयी आपण बातम्या वाचल्या. या सेंटरच्या स्वच्छतेसाठी डीएम एन्टरप्रायझेस या एजन्सीला शासनातर्फे ठेका मिळाला आहे. सफाई कामगारांना 17 हजार रूपये पगार मंजूर असून प्रत्यक्ष कामगारांना केवळ 4 हजार रूपये पगार मिळत आहे. रूग्णांना जेवण देण्यासाठी शासनाकडून 120 रूपये देण्यात येतात, परंतु हेच जेवण दुसऱयाकडून 70 रूपयात करून देत आहे. यामुळे शासनाकडून मोठय़ाप्रमाणावर निधी खर्च होत असताना या एजन्सीच्या चाललेल्या अनागोंदी कारभाराकडेही आपण लक्ष घातल्याचे आमदार जाधव म्हणाले.
गुहागरसाठी 10 ऑक्सिजन बेडना तत्वतः मान्यता
गुहागरसाठी आणलेल्या या रूग्णवाहिकेवर गुहागर ग्रामीण रूग्णालय वेगळा खर्च करू शकत नाही. यामुळे ही नवी रूग्णवाहिका 108 चालवणाऱया एजन्सीकडे देऊन ती 108प्रमाणे सेवा देईल असेही त्यांनी सांगितले. गुहागर तालुक्यासाठी ऑक्सिजन बेड नसल्याचे दर्शनास आणून दिले असता आमदार जाधव यांनी गुहागर ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्याठिकाणी 10 बेडची व्यवस्था होऊ शकते हे पाहून तातडीने जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधून गुहागरसाठी 10 ऑक्सिजन बेडकरिता तत्वतः मान्यता घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, जिल्हा उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, विनायक मुळे, मुख्याधिकारी कविता बोरकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन बाईत, शहर प्रमुख नीलेश मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, प्रविण ओक, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, पुनम पाष्टे, सीताराम ठोंबरे, पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर आदी उपस्थित होते.