काँग्रेस प्रभारी तालुकाध्यक्षही बांधणार ‘घडय़ाळ’
प्रतिनिधी/ गुहागर
सर्वांना समान न्याय, सर्वांचा समान विकास या मुद्यावर नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली गुहागरमधील शहर विकास आघाडीची पावले राष्ट्रवादीच्या घडय़ाळाकडे वळू लागली आहेत. या अनुषंगाने बोलाचालीची टीकटीक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे निष्ठावान प्रभारी तालुकाध्यक्षही घडय़ाळ बांधण्यासाठी उत्सुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विकासासाठी कोणताही पक्ष नको, सर्वांना समान न्याय, समान हक्क व समान विकास असे धोरण मांडत तयार झालेल्या शहर विकास आघाडीने आपली ताकद नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवून दिली. नगराध्यक्षांसहीत एकहाती सत्ता प्राप्त करण्यात आघाडीला यश आले. आता हीच आघाडी अडीच वर्षाने राष्ट्रवादीच्या आश्रयाला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडून आल्यानंतर तब्बल एक वर्षाने खासदार सुनील तटकरे यांनी गुहागर दौरा केला. आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकाकी पडलेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी स्थानिक निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांनी सहदेव बेटकरांच्या माध्यमातून पक्ष व सामाजिकतेची मोट बांधून जाधव यांना जोरदार टक्कर दिली. त्यावेळीही तटकरे यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली होती. मात्र गेल्या आठवडय़ातील दौऱयात तटकरे यांनी पदाधिकाऱयांच्या नेमणुका करत राष्ट्रवादीची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तटकरेंच्या संपर्कात असलेले नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या सहकाऱयांसमवेत राष्ट्रवादी प्रवेशाबाबत दोघांनीही नकार न देता ‘योग्य वेळी निर्णय’ घेण्याच्या उत्तराने आघाडीची टीकटीक सुरू झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. शहर विकास आघाडीने शिवसेना, भाजप व आता राष्ट्रवादी अशा सर्वांनाच बरोबर घेऊन अडीच वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र पक्षविरहित म्हटल्या गेलेल्या आघाडीची पावले घडय़ाळाकडे वळत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राजेश बेंडल यांचा पक्षप्रवेश झाला तर तो आघाडीतील सहकाऱयांसमवेतच होणार हे निश्चित आहे. मात्र या आघाडीत अन्य पक्ष सोडून आलेलेही कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांची मने वळवण्यात ते कितपत यशस्वी होतात याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेस प्रभारी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी प्रवेशासाठी सज्ज
सध्या तालुक्यात काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र आहे. यामुळे काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही सहकाऱयांसह राष्ट्रवादीचे घडय़ाळ बांधण्याची तयारी सुरु केल्याचे विश्वसनीय गोटातून सांगण्यात येत आहे. काँग्रेस व शहर विकास आघाडी ‘मुहूर्त’ बघून बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेशाचा योग साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.