वार्ताहर/ गुहागर
गुहागर एसटी बसस्थानकातून बाहेर पडलेली बस आगाराच्या प्रवेशद्वाराजवळच पंक्चर झाल्याने आगाराच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुहागर आगाराच्या बसेस पंक्चर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बसेसची कार्यशाळेत देखभाल दुरुस्ती, तपासणी केली जाते का नाही, यावरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गुहागर आगाराची गुहागर-चिपळूण ही बस सकाळी 11 च्या सुमारास बसस्थानकातून सुटली व प्रवेशद्वारातून बाहेर पडताक्षणीच टायरचा आवाज आला.
बसस्थानकासमोरच श्रीदेव व्याडेश्वर मंदिराजवळ अरुंद रस्त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या अरुंद रस्त्यावरच बस पंक्चर झाल्याने सुमारे 1 तास प्रवाशांसह अनेक वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. आगाराच्या कार्यशाळेतील कर्मचाऱयांनी बसचा टायर बदलून वाहतूक पूर्ववत केली.