ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑनलाईन व्यवहारासाठी वापरले जाणारे ‘पेटीएम’ हे ॲप गूगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे आता पेटीएम ॲप अँड्रॉइड युजर्स काही काळासाठी डाऊनलोड करु शकणार नाहीत.
मात्र, अजूनही पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिझनेस आणि पेटीएम मनी ॲप गूगलने आपल्या प्ले स्टोअरवर कायम ठेवले आहेत. तसेच ॲप्पलच्या ॲप स्टोअर मधून अजूनही पेटीएम डाऊनलोड करता येईल.
दरम्यान, गुगल प्ले वरून पेटीएम ॲप हटवल्यानंतर पेटीएमकडून ट्विट करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, हे ॲप वापरणाऱ्या युजर्सना काळजी करण्याची गरज नसून त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. लवकरच आम्ही या प्लॅटफॉर्मवर परत येऊ.
गूगलने शुक्रवारी सांगितले की, पेटीएम या ॲपवरून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करून सट्टेबाजीसाठी परवानगी दिली जाते. आणि हे सर्व गूगलच्या नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.