चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांसोबतचा प्रकार – कोरोनावर मोठा खुलासा
वृत्तसंस्था / वुहान
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध लावण्यासाठी वुहानमध्ये पोहोचलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाच्या दौऱयादरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे. रहस्यमय गुहांमधून वटवाघळांचे नमुने प्राप्त करताना काही वटवाघळांनी चावा घेतला होता असे वुहान प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. या चिनी गुहा कोरोना विषाणूने संक्रमित वटवाघळांचे वास्तव्यस्थान असल्याचे मानले जाते. एका चित्रफितीत वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ वायरोलॉजीच्या वैज्ञानिकांनी वटवाघळांचे नमुने प्राप्त करताना दाखविलेला बेजबाबदारपणाही दिसून आला आहे.
वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ वायरोलॉजीवर सुरक्षा मापदंडांना पायदळी तुडवून कार्य केल्याचे आरोप वारंवार झाले आहेत. 29 डिसेंबर 2017 च्या सीसीटीव्हीच्या एका चित्रफितीत चिनी प्रयोगशाळेच्या निष्काळजीपणाचा पुरावा मिळाला आहे. ही चित्रफित चीनच्या बॅटवुमन म्हणवून घेणाऱया वेज्ञानिक शी झेंगली आणि त्यांच्या पथकाने सार्सच्या स्रोताचा शोध लावण्याचा प्रयत्न दाखविण्यासाठी तयार करण्यात आली होती.
जैवसुरक्षा पातळी 4 ची प्रयोगशाळा म्हणवून घेणाऱया वुहान लॅबच्या वैज्ञानिकांनी गुहेत वटवाघळं पकडताना अत्यंत बेजबाबदारपणा दाखविला. यातूनच एका चिनी संशोधकाचा वटवाघुळाने चावा घेतला होता. स्वतः संशोधकाने चित्रफितीत ही बाब मान्य करत स्वतःचा जखमी हातही दाखविला आहे. पथकाचे सदस्य वटवाघळाचे अत्यंत संक्रामक मलमूत्र हाफ पँट आणि टी-शर्ट परिधान करून जमा करत असल्याचे चित्रफितीत दिसून येते. यादरम्यान कुणीच पीपीई किट घातलेले नव्हेत.
विषारी दात सुईप्रमाणे टोचले गेले
वटवाघळाचे विषारी दात रबरी मोज्यात शिरले आणि माझ्या हातात सुई घुसत असल्याचे वाटल्याचे वुहान लॅबच्या संशोधकाने म्हटले होते. याचबरोबर प्रयोगशाळेतील कर्मचारी ग्लोव्हजशिवाय काम करताना दिसून आले. हे लोक ‘जीवंत’ विषाणूवर काम करत असतानाही मास्कही घालणे त्यांनी टाळले होते. जागतिक आरोग्य संघटनेने अशा प्रयोगशाळेत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पीपीई किट अनिवार्य केले असतानाही चीनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत आहे. डब्ल्यूएचओचे पथक कोरोनाच्या उत्पत्तिच्या चौकशीसाठी चीनमध्ये असताना हा खुलासा झाला आहे. चीनने दीर्घ कालावधीनंतर चौकशी पथकाला वुहानमध्ये जाण्याची अनुमती दिली आहे.
बॅटवुमनने शेखी मिरवली
चित्रफितीत जीवंत वटवाघळं दाखविण्यात आली आहेत. वैज्ञानिकांनी ग्लोव्हज घातले असले तरीही त्यांना वटवाघळांच्या चाव्याचा धोका आहे. वटवाघळाने चावा घेतल्याने सांध्यांना सूज आल्याचे एका वैज्ञानिकाने चित्रफितीत दर्शविले होते. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे घातक विषाणू असतात. पथकातील प्रत्येक सदस्याला गुहेत जाण्यापूर्वी रॅबिजची लस देण्यात आली होती. ही चित्रफित सर्वप्रथम चायना सायन्स एक्सप्लोरेशन सेंटरने प्रसारित केली होती, परंतु चीनने नंतर ती दडपली होती. वटवाघळांवरील संशोधन फारसे धोकादायक नाही. वटवाघुळ अनेक प्रकारचे विषाणू बाळगत असला तरीही त्यांचा थेट मानवाला संक्रमित करण्याचा धोका अत्यंत कमी असल्याची शेखी चिनी बॅटवुमनने मिरवली होती.