बसवराज बोम्माई यांच्याकडून शिग्गाव येथे बाधितांच्या उपचाराची व्यवस्था
प्रतिनिधी, वार्ताहर / बेंगळूर, हुबळी
कोरोना महामारीमुळे रुग्णांना इस्पितळांमध्ये बेड मिळणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. दरम्यान, गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी हावेरी जिल्हय़ातील शिग्गाव येथे आपल्या निवासस्थानीच 50 बेड्स क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. इतकेच नव्हे; तर तेथे रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱयांची नियुक्तीही केली आहे.
गृहमंत्री बसवराज बोम्माई हे शिग्गाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. कोरोना रुग्णांना बेड्सची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानाबाहेरील खुल्या जागेत कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे एकाच वेळी 50 बाधितांवर उपचार करता येणार आहे. त्यामुळे शिग्गाव तालुका इस्पितळावरील भार कमी होणार आहे.
बोम्माई यांनी गुरुवारी कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून रुग्णांना आणखी साहाय्य करण्याचा त्यांचा विचार आहे. श्वसनाचा त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी त्यांनी 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिग्गाव तालुका इस्पितळाकडे हस्तांतर केले. शिवाय त्यांनी येथील इस्पितळात रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या सुविधांचीही पाहणी केली. तसेच या ठिकाणी 46 अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली.