नागरिकांना शिस्त लावण्यासाठी गृहरक्षक ऑन डय़ुटी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची लढाई यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनच्या माध्यमातून घरी रहा, सुरक्षित रहा याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या संकटछायेत नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सुविधांच्या माध्यमातून कार्यरत असलेले कोरोना योद्धे ही लढाई समर्थपणे पेलताना दिसत आहेत. या लढय़ात पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून कोरोनाची लढाई यशस्वी करण्यासाठी गृहरक्षक म्हणून सेवा बजाविणारे होमगार्ड कार्यरत आहेत. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी नागरिकांचे सुरक्षारक्षक म्हणून होमगार्ड अर्थात गृहरक्षक हेदेखील कोरोना लढाईतील योद्धेच आहेत.
कोरोनाच्या लढाईत नाकाबंदीपासून कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात येणाऱया पोलीस प्रशासनाच्या व्यवस्थापनात होमगार्ड आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना शिस्त लावण्यापासून रस्त्यावर फिरू नये, यासाठी गृहरक्षक ऑन डय़ुटी आहेत. कोरोनाची संकटछाया दाट होत असताना प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व सामाजिक अंतराचे भान राखण्यासाठी डय़ुटीनुसार नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा बजाविणारे गृहरक्षक कोरोनाच्या संकटछायेत प्रत्येकाचे रक्षक बनले आहेत.
घरी रहा सुरक्षित रहा, या आवाहनाप्रमाणे नागरिकांनी घरीच राहून कोरोनाची लढाई लढायची आहे. मात्र त्यांनी घरात राहावे यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आपण सेवेत राहणारे गृहरक्षक समाजरुपी घराची काळजी घेताना दिसत आहेत. नाकाबंदी, नाईट पेट्रोलियम, ट्रफिक व्यवस्था, कोरोना बंदोबस्त या सेवेत होमगार्ड कार्यरत आहेत. सण-समारंभांच्या काळात पोलीस प्रशासनाच्या बरोबरच तसेच दैनंदिन नियोजनातदेखील होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱया रक्षकांची सेवा मोलाची ठरते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या लढाईत हे योद्धे आपली सेवा बजाविताना दिसत आहेत.
शहरात ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने कोरोनाच्या लढाईत प्रशासनाच्या सोबत सेवा बजाविणाऱया होमगार्डशी संवाद साधला असता या सेवेत आपणदेखील कार्यरत असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. आठ तासांची सेवा बजाविताना कसरत तर आहेच, मात्र सेवा व कर्तव्य म्हणून आजच्या परिस्थितीतही आम्ही कार्यरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत बेळगावमध्ये साधारण 240 होमगार्ड कार्यरत असून पुरुषांच्या बरोबरीने महिला होमगार्डदेखील आपली डय़ुटी करताना दिसत आहेत. दोन शिफ्टनुसार होमगार्ड सेवेत आहेत. शहर थंडावले, शुकशुकाट आणि कोरोनाचीच धास्ती मात्र आपण गृहरक्षक म्हणून होमगार्डचा युनिफॉर्म आणि सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करून रक्षक ऑन डरुटी आहेत.
महिला गृहरक्षक सेवेत
संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे स्तब्ध झाला आहे. मात्र डय़ुटीस्थळी स्तब्ध राहून सेवा बजाविणारे महिला गृहरक्षक कुटुंब कोरोनाचे संकट आणि डय़ुटी यांचा ताळमेळ साधत सेवेत आहे. स्व-सुरक्षेबरोबरच कुटुंबाची सुरक्षितता आणि डय़ुटीवर असताना नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी पेलताना महिला गृहरक्षक म्हणून सूचनेनुसार होमगार्ड कार्यरत आहेत. यामुळे महिला गृहरक्षकांची सेवा कोरोनाच्या लढाईत शहराला शिस्त लावताना आणि गर्दी टाळण्यासाठी तितकीच मोलाची ठरत असल्याचे चित्र संचारबंदीच्या काळात पाहायला मिळत आहे.