महासंचालक पदकासाठी शिफारस करणार
प्रतिनिधी/ सातारा
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला जेरबंद करुन पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याची अतुलनीय कामगिरी बजावणाऱया मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे या जोडगोळीचा त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल सत्कार करत खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या पाठीवर शाबसकीची थाप टाकली. दरम्यान, यावेळी मंत्री देसाई यांनी या कामगिरीबद्दल त्यांची महासंचालक विशेष पदकासाठी शिफारस करणार असल्याचेही जाहीर केले.
पोलीस मुख्यालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते एपीआय माने व हवालदार कांबळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
गुंड गजा मारणेवर पुण्यात एमपीएडी कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तो फरार झाला होता. तो सातारा जिल्हय़ात असल्याचे समोर येत होते. त्यामुळे एसपी अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी जिल्हय़ात पोलीस दल सतर्क केले होते. मात्र, गुंड गजा मारणे जिल्हय़ात नेमका कोठे आहे याची कल्पना येत नव्हती. त्याच्या गाडीचा क्रमांकावरुन त्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, तोच खतरनाक गुंड गजा मारणे जावली तालुक्यात फिरत होता.
मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व हवालदार जितेंद्र कांबळे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या नजरेस एक अलिशान गाडी दिसून आली. दोघांनीही मग त्या गाडीचा पाठलाग सुरु केला. मेढा येथे अलिशान गाडीला पोलीस गाडी आडवी मारुन ती थांबवण्यात आली. आत कोण आहे हे माहिती नव्हते. मात्र, खात्री करण्यासाठी माने व कांबळे यांनी त्या अलिशान गाडीतील सर्वांना खाली उतरण्यास सांगितले.
अलिशान गाडीतील सगळय़ांनी मास्क घातले होते. त्यातील एकाने टोपी व मास्क परिधान केला होता. त्यांचे फोटो मोबाईलवर घेवून एपीआय माने गजा मारणेच्या तपासार्थ असलेल्या पथकाला पाठवले. मात्र, त्यांनी त्यातील एकाचा फोटो टोपी व मास्क काढून घ्या कारण गजाला टक्कल असल्याचे सांगितले. तेव्हा माने यांनी संबंधित व्यक्तीला तसे सांगताच त्याने स्वतः मी गजा मारणे असल्याचे सांगितले. मात्र, माने व कांबळे यांनी त्यांच्या सहकाऱयांना बोलावून घेत या गजा मारणेसह सर्वांना ताब्यात घेतले.
काहीही घडू शकले असते
गजा मारणे व त्याचे साथीदार हे अत्यंत घातक होते. त्यांच्याजवळ शस्त्रs असण्याचीही शक्यता होती. मात्र, एपीआय माने व हवालदार कांबळे यांनी जीवाची पर्वा न करता निर्भिडपणे समोर आलेल्या परिस्थितीला हाताळत चक्क गजा मारणेच्या गाडीचा पाठलाग केला होता. तो गजा मारणे हे समोर आल्यावर मेढा पोलीस देखील अंचबित झाले होते. मात्र गजा मारणेला सत्य कळून आल्याने तो काहीही प्रतिक्रिया न देता पोलिसांच्या ताब्यात राहिला. नंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुंडांकडून काहीही घडू शकले असते मात्र मेढा पोलिसांनी धाडसाने या गुंडांना जेरबंद केले.
महासंचालक पदकासाठी शिफरास करणार
गुंड गजा मारणे तळोजा जेलमधून सुटल्यापासून त्याने जो प्रकार केला होता. त्यामुळे तो पुणे पोलिसांच्या रडारावर होता. गृहराज्यमंत्री म्हणून मी देखील त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महाआघाडीचे शासन अपप्रवृत्तींना कधीही पाठीशी घालणार नाही. एपीआय माने व हवालदार कांबळे यांनी जीवावर खेळूनच ही कामगिरी बजावली असून ती अभिनंदनीयच आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव पोलीस महासंचालक विषेश पदकाने व्हावा म्हणून मी निश्चितपणे शिफारस करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.