प्रतिनिधी / कोल्हापूर
विरोधक गृहराज्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या चमच्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगड मारणे, केबल कापणे, जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱयांना धमकावणे असे उद्योग सुरु आहेत. पण त्यांचे मंत्रीपद तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहणार नाही. त्यामुळे त्यांच्या चमच्यांनी जास्त उडय़ा मारु नयेत. आम्ही मागे लागलो तर त्यांना झेपणार नाही हे लक्षात ठेवावे, असा गर्भित इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला.
मेरी वेदर मैदानावर आयोजित केलेल्या 13 व्या भिमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर व महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागत, प्रास्ताविक करताना ते बोलत होते.
पराभव झाल्यानंतर दाढी वाढवून अज्ञातवासात गेलो नाही
माजी खासदार महाडिक म्हणाले, स्वतःचे लाखो रूपये खर्च करून भिमा कृषी प्रदर्शनाचा उपक्रम गेल्या 13 वर्षांपासून सुरु आहे. या प्रदर्शनामधून मी पैसे मिळवत नाही. पण प्रदर्शनासाठी गोकुळकडून देणगी घेतली जाते अशी टिका विरोधकांकडून केली जाते. शेतकरी हितामध्ये विरोधकांनी राजकारण आणू नये. राजकारणात जय पराजय होत असतो. पण मी पराभूत झालो म्हणून टिव्ही फोडली नाही, केबल तोडली नाही. दाढी वाढवून अज्ञातवासात गेलो नाही. दुसऱया दिवशी जनतेच्या कामांसाठी कार्यालयात उपस्थित राहिलो. आम्ही संपलो अशी वक्तव्ये विरोधकांकडून केली जात आहेत. पण कोणी म्हटले म्हणून कोणी संपणार नाही, अशी स्पष्टोक्ती महाडिक यांनी केली.
शहर आमदारांचा रिमोट बावडय़ात
शेतकऱयांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी प्रदर्शन भरविण्यासारखे चांगले काम आम्ही करत आहे. पण मी दिल्लीत असताना या प्रर्शनाच्या मंडप उभारणीला शहरच्या आमदारांनी विरोध केला. खेळाडूंचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. पण ते उद्योजक आहेत. त्यांनी चुकीच्या राजकारणामध्ये पडायला नको होते. शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. पण ते तरी काय करणार ? त्यांचा रिमोट कंट्रोल कसबा बावडय़ात आहे. बावडय़ातून रिमोटचे बटन दाबल्यामुळे ते आले असवेत असा टोलाही माजी खासदार महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांना लगावला. तुम्हीही आमदार असल्यामुळे कार्यक्रम घेणार आहात. यावेळी आमचे कार्यकर्ते कार्यक्रमात घुसले तर तुम्हाला झेपणार नाही, गर्भित इशाराही माजी खासदार महाडिक यांनी दिला.
मंत्री पदासाठी कोणता अंगारा आणला माहिती नाही – महाडिक
तरुण असल्यामुळे मंत्री पदाच्या माध्यमातून ते चांगले काम करतील अशी धारणा ठेवून त्यांना मंत्री पद देण्यात आले. पण या मंत्री पदासाठी त्यांनी कोणता अंगारा आणला माहिती नाही. ते दुसऱयांदा गृहराज्यमंत्री झाले. पण त्यांचे मंत्रीपद फार काळ टिकणार नाही, असा टोला माजी खासदार महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.