प्रतिनिधी / सातारा :
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच शासकीय लवाजमा बाजुला सारत त्यांच्या मोटार सायकलवरून शहर पोलीस ठाण्यात अचानक भेट देवून कामाचा आढावा घेतला होता. असाच शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी त्यांनी चक्क पोलीसांच्या गाडीचे स्टिअरिंग हाती घेत शहरातून फेरफटका मारला.
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे मुळ गाव पाटण ता. सातारा हे असून ते सातारा शहरात गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. यामुळे सातारा शहरावर त्यांचा वॉच नेहमी असतो. नागरिकांच्या सुरक्षितेला ते नेहमी प्राधान्य देतात. नागरिकांसह पोलीसांच्या कामावर आणि अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर ते भर देतात. त्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी यामाहा मोटार सायकलवरून शहर पोलीस ठाण्यात अचानक भेट देवून कामाचा आढावा घेतला होता. शहर पोलीसांच्या तपासावरून अधिकारी ते कर्मचारी यांना फैलावर घेतले होते. नीट काम करण्याची चांगली तंबी दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने त्यांनी सातारा शहरातील बाजारपेठेत जावून किरकोळ विक्रेते ते दुकानदार यांच्याशी संवाद साधून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी गृहराज्यमंत्र्यांनी सातारा पोलीसांची गाडी स्वत: चालवत शहरातून फेरफटका मारण्यास सुरूवात केली. कर्मवीरपथ ते राजपथ व इतर भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलीस गाडीचे स्टेअरिंग हाती घेत फेरफटका मारल्याची माहिती सोशल मिडियावर कळताच सर्वत्र चर्चा सुरू होती.