तामिळनाडू निवडणूक : शशी थरूर यांच्याकडून कल्पनेचे स्वागत
वृत्तसंस्था / चेन्नई
मक्कल नीधि मैयम (एमएनएम) पक्षाचे अध्यक्ष तसेच अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी घोषणापत्र सादर केले आहे. सत्तेवर आल्यास गृहिणींना मासिक वेतन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे. मासिक वेतनामुळे गृहिणींना एक ओळख प्राप्त होणार असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
हासन यांच्या मक्कल नीधि मैयमने तामिळनाडूत प्रचारास प्रारंभ करत स्वतःच्या आर्थिक धोरणांचा मुद्दा मांडण्यावर भर दिला आहे. यात तामिळनाडूच्या गृहिणींना मासिक वेतन देण्याचे आश्वासन सामील आहे. महिलांना शिक्षण, रोजगार आणि उद्योगाद्वारे सशक्त करण्यात येणार आहे. गृहिणींकडे समाजाकडून अनेकदा दुर्लक्ष केले जाते, तसेच त्यांच्या योगदानाकडे लक्ष दिले जात नाही. याचमुळे गृहिणींना मासिक वेतन देण्यात येणार असून यातून महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यास मदत मिळणार असल्याचे एमएनएम पक्षाने म्हटले आहे. यासंबंधी पक्षाने 7 सूत्री सुशासन आणि आर्थिक धोरण मांडले आहे.
आगामी निवडणुकीत तामिळनाडूची जनता द्रमुक आणि अण्णाद्रमुक या भ्रष्ट पक्षांपासून मुक्तता इच्छित आहे. माझ्या पक्षाला मिळत असलेले लोकांचे प्रेमच याचा पुरावा आहे. अण्णाद्रुमक आणि दमुक या पक्षांच्या विरोधात एमएनएम लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे हासन म्हणाले.