केएलई इंटरनॅशनल शाळेच्या अंश राव याच्या कल्पकतेतून साकार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना काळात मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करत अंश राव या हायस्कूलमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्याने गॅरेजमधील टाकाऊ साहित्याचा उपयोग करून कार तयार केली आहे. टाकाऊतून टिकावू ही स्पर्धा सर्रास घेतली जाते. शाळेमध्ये विद्यार्थी विविध प्रयोग करतात. पण अंशने त्यापासून चक्क कार तयार करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. मुख्य म्हणजे या कारचा ताशी वेग 30 ते 40 कि.मी. आहे.
अंशला लहानपणापासूनच विविध कारचे आकर्षण आहे. त्याच्या खेळण्यातसुद्धा अनेक कारगाडय़ांचा समावेश आहे. यंदा कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमध्ये फावला वेळ मिळाला, तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग करत त्याने कार तयार करण्याचे ठरविले आणि एक महिन्यात टू-सीटर इलेक्ट्रीक कार तयार केली.
यासाठी शहरातील अनेक गॅरेजमध्ये जाऊन त्याने टाकावू साहित्य म्हणजेच कच्चा माल मिळविला आणि त्याची जोडणी करून जून-जुलै या महिन्यात कार तयार केली. या दोन आसनी कारला रिअरह्यु मिरर नसून कॅमेरा आहे. अलीकडे कारगाडय़ांची किंवा कारमधील साहित्याची होणारी चोरी लक्षात घेऊन त्याने कारमध्ये अलार्मची सोय केली आहे. अंश हा केएलई इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे.