आप नेते महादेव नाईक यांची सरकारवर टिका
प्रतिनिधी /शिरोडा
ऐन चतुर्थीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग दोन वेळा 50 रुपये वाढ करून भाजपा सरकारने गोमंतकीय जनतेला चतुर्थीची भेट दिलेली आहे, अशी खरमरीत टीका आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव नाईक यांनी केली आहे. कोरोनामुळे आधीच अनेक नागरिकांना आपल्या नोकऱया धंद्यावर पाणी सोडावे लागले आहे. त्यात पेट्रोल, घरगुती सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठय़ा प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईच्या या स्फोटात सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे. पेट्रोलचे दर शंभरीला टेकले असून घरगुती गॅस सिलिंडर रु. 900 वर पोचला आहे. सामान्य नागरिक मात्र आपल्या रोजगारीची साधने हरवून बसलेला आहे. भाजपा सरकारचे हेच काय ते अच्छे दिन ? असा सवाल महादेव नाईक यांनी उपस्थित केला आहे. गोमंतकीय जनतेने ज्या विश्वासाने भाजपा सरकारला सत्तेवर आणले त्याची पोचपावती महागाईचा बोजा लादून हे सरकार फेडीत आहे. ऐन सणासुदिच्या काळात केलेली गॅस सिलिंडर दरवाढ सरकारकडून गोमंतकीयांना चतुर्थीची भेट समजायची का? गोव्यातील भाजपा सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. नवीन कायदे आणून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक व छळवणूक आरंभल्याचा आरोपही त्यांनी केला. एकीकडे घरगुती सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे सरकारने कोरोनाचे निमित्त पुढे करून सिलिंडरवरील अनुदानही बंद केले आहे. सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घेऊन गोमंतकीय जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही महादेव नाईक यांनी केली आहे.