कराची : श्रीलंकेमध्ये 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान पहिली लंकन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा हंबनटोटा येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱया गॅले ग्लॅडिएटर्स संघाचे नेतृत्व पाकचा माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदीकडे सोपविण्यात आले आहे.
लंकेत होणाऱया या पहिल्या स्पर्धेला कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसत आहे. या स्पर्धेसाठी पाकमधील उद्योगपती नदीम ओमर यांनी शाहीद अफ्रिदीला खेळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नदीम ओमर हे पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया क्वेट्टा ग्लॅडीएटर्सचे मालक आहेत. सुरूवातीला उद्योगपती नदीम ओमर यांनी गॅले ग्लॅडिएटर्सच्या कर्णधारपदी सर्फराज अहमदची घोषणा केली होती. पण तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होवू शकणार नसल्याने त्यांच्या जागी शाहीद आफ्रिदीची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेतून विविध कारणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल, डु प्लेसिस, प्लंकेट, मलान, मलिंगा, कमरान अकमल, वहाब रियाज, मोहम्मद हाफीज यांनी माघार घेतली आहे. या स्पर्धेत पाच संघांचा समावेश राहील.