प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डात अदानी गॅस प्रा. लि. ची घरगुती गॅसची भूमिगत वाहिनी टाकण्यास लाल झेंडा दाखविला आहे. यासंदर्भात सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित विभागाला पत्र लिहिले असून वरील गॅसवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यास परवानगी देऊ नका, अशी मागणी केली आहे.
वाहिनीद्वारे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठय़ाची फातोर्डाला सध्या गरज नाही. या मतदारसंघातील ग्राहक मुख्यत्वे बीपीसीएल आणि एचपीसीएल या एजन्सींशी जोडलेले आहेत व सुरळीत गॅस सिलिंडर पुरवठा होत असतो, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाची मडगाव पालिकेवर सत्ता होती व गेल्या महिन्यात पालिकेच्या एका बैठकीत इंडियन ऑईलचा एक प्रस्ताव नाकारण्यात आला होता तसेच लीजवर जमीन देण्याची अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेडची विनंती पालिका मंडळाने फेटाळली होती. वाहनांना पर्यावरणास पोषक स्वच्छ इंधन पुरविण्यासाठी सीएनजी इंधन स्टेशन उघडण्यासाठी 2000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेसंदर्भात हा प्रस्ताव होता.
सरदेसाई यांनी साबांखाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात खोदकामांमुळे होणाऱया उपद्रवांकडे अधिकाऱयांचे लक्ष वेधले आहे. फातोर्डा मतदारसंघात गॅसवाहिनी बसविण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी मिळविण्याच्या तयारीत इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड (आयओएजीपीएल) असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून आपणास माहिती मिळाली आहे. ग्राहकांना वाहिनीद्वारे स्वयंपाकाचा गॅस देण्यासाठी खोदकाम केल्याने फातोर्डा मतदारसंघांतील सर्व मोठे आणि अंतर्गत रस्ते नष्ट होतील. राज्याची आर्थिक स्थिती पाहिल्यास खोदलेले रस्ते लवकर पूर्ववत करणे शक्मय होणार नाही. यामुळे रहिवाशांना मोठे त्रास होतील. त्यातून अपघात व जीवितहानी होण्याची भीती आमदार सरदेसाई यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर साबांखाच्या विभाग-6 ने या पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.