समर्थनगर येथील घटना- दीड वर्षाचा बालकही जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
गॅस गळतीने भडका उडून एकाच कुटुंबातील तिघेजण भाजून जखमी झाले. शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास समर्थनगर परिसरात ही घटना घडली असून जखमीत एका दीड वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
समर्थनगर, तिसरा क्रॉस परिसरात ही घटना घडली आहे. उळवाप्पा शिवपुत्राप्पा हुलीकट्टी (वय 35), त्यांची पत्नी बसव्वा हुलीकट्टी (वय 30) व मुलगा नागराज (वय दीड वर्षे) हे जखमी झाले आहेत. उळवाप्पा गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार उळवाप्पा हा एका प्लंबिंग साहित्याच्या दुकानात काम करतो. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्या पत्नीने तयारी सुरू केली. न कळत गॅस सुरू करण्यात आला. मात्र, शेगडी पेटविण्यात आली नाही. बसव्वा भाजी चिरेपर्यंत गॅस सुरूच होता. त्यानंतर बसव्वा गॅस पेटविण्यासाठी गेली, त्यावेळी अचानक भडका उडाला. त्यामुळे मोठा आवाज आला. घराच्या छतावरील पत्रे उडून गेले. त्याचबरोबर अंथरुणाने पेट घेतला. या घटनेनंतर पत्नीला वाचविण्यासाठी आलेला उळवाप्पाही भाजून जखमी झाला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक उळवाप्पाच्या घराकडे धावले. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून बचावासाठी आरडाओरड सुरू होती.
स्थानिक नागरिकांनी दरवाजा ठोठावल्यानंतर उळवाप्पाने दार उघडले. मात्र दाम्पत्य व त्यांचा मुलगा भाजून जखमी झाले होते. शेजाऱयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.