शहरातील रस्ते खोदकामाला उपसूचनेसह मंजुरी; सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराला पाईप लाईनव्दारे गॅस पुरवठा करणाऱया योजनेच्या खोदकामाला मंगळवारी झालेल्या महानगपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली. या योजनेतर्गंत शहरातील रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. ते करताना रस्ते खराब होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी एका उपसूचनेव्दारे महापालिकेच्या प्रशासनाकडे सोपवित सभागृहाने प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या दूरदृष्टीतून आकारास येणाऱया या योजनेच्या कामाला आता गती मिळणार आहे.
हिंदूस्थान पेट्रोलियम गॅस कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला पाईप लाईनव्दारे गॅस पुरवठा करण्याची बहुचर्चित योजना खासदार संभाजीराजे यांनी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणली. या योजनेच्या कामाला प्रारंभही झाला आहे. मात्र कोल्हापूर शहरात गॅस वितरणासाठी पाईप लाईन टाकण्याच्या कामाला अद्याप महापालिकेच्या सभागृहाची मंजुरी मिळाली नव्हती. गेल्या महिन्यात तहकूब सभेनंतर खासदार संभाजीराजे यांनीही मंजुरी न मिळाल्याबद्दल महापालिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती.
या योजनेतर्गंत शहरात 129 किलो मीटरची गॅस पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. या कामाला मंजुरी देण्याविषयीचा प्रस्ताव शहर अभियंता विभागाने आजच्या सभेपुढे ठेवला होता. त्यावर झालेल्या चर्चेत खोदकामासाठी महापालिकेने हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीकडे 66 कोटी रूपयांची डिमांड केली होती. त्या 66 कोटींचे आता सहा कोटी कसे झाले?, असा प्रश्न नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी उपस्थित केला. त्यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ही योजना केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारच्या डीएसआरच्या दरानुसार रक्कम महापालिकेला मिळणार आहे. महापालिकेचा डीएसआरपेक्षा केंद्राच्या डीएसआरचे दर कमी आहेत. त्यामुळे रकमेत फरक आहे, असा खुलासा केला. तेंव्हा प्रा. पाटील आणि कदम यांनी दरवेळी अर्धवट प्रस्ताव ठेवून सभागृहाची दिशाभूल करू नका, असे सांगत खोदकाम केल्यानंतर रस्ता पूर्वी होता त्या दर्जाचा करून करून द्या, अशी मागणी केली.
दीड वर्षांनी का होईना पण गॅस पाईप लाईनच्या खोदकामाला महापालिकेने परवानगी दिल्याबद्दल सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांचे आभार. या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या गृहिणी आणि हॉटेल व्यावसायिकांना लाभ होणार आहे. सुविधा आणि सुरक्षा मिळणार आहे.
-संभाजीराजे छत्रपती, खासदार