प्रतिनिधी/कोल्हापूर
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दिवसे दिवस प्रचंड वाढ होत आहे. सध्या 900 रूपयांना एक गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. त्यात सरकारने जाहीर केलेले सिलेंडरचे अनुदान बंद केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना हा दर परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने गॅस सिलिंडरचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, गॅस सिलिंडरचे दर कमी केल्याचे सांगून सरकारने अनुदान बंद केले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात हळूहळू वाढ केली. आता हा दर 900 वर येवून ठेपला आहे. या वाढीव गॅस सिलिंडरच्या दराने दिवाळी महोत्सवात लोकांचे हाल होणार आहे. केंद्रसरकारने दिवाळीपुर्वी अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करणार, असा ईशाराही देण्यात आला. दसरा चौकात निदर्शना दरम्यान `परत करा परत करा, गॅसचे अनुदान परत करा’ अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत परिसरातील लोकांचे लक्ष वेधले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, निलेश सीतार, आसिफ स्वार, संदीप यादव, संतोष खोत, युवराज जाधव, दत्तात्रय चौगुले, अभिजित पाटील, अरूण जकाते, संभाजी घोरपडे आदी उपस्थित होते.