घरगुती 25 तर कमर्शियल सिलिंडर 75 रुपयांनी महागला- सणासुदीत सर्वसामान्यांना मोठा आर्थिक चटका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विनाअनुदानित एलपीजी घरगुती सिलिंडरच्या किमती बुधवारी पुन्हा 25 रुपयांनी वाढवण्यात आल्या. ताज्या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 884.50 रुपये झाली आहे. तसेच कर्नाटकात हा दर जवळपास 893.50 रुपये झाला आहे. घरगुती सिलिंडरबरोबरच 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करायच्या, वाढवायच्या की नाही हे ठरवतात. गेले काही महिने सातत्याने एलपीजीच्या दरात वाढ केली जात आहे. 1 जानेवारी ते 1 सप्टेंबरदरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीही पुन्हा वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे 2020 पासून सबसिडी काढून टाकल्यामुळे आता ग्राहकांच्या बँकखात्यातही अनुदानाचे पैसे जमा होत नसल्यामुळे सिलिंडरसाठी पूर्ण किंमत मोजावी लागत आहे.
कोलकाता, चेन्नईत 900 पार झेप
14.2 किलो अनुदानित सिलिंडरची किंमत आता कोलकातामध्ये 911 रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्याखालोखाल चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरसाठी मंगळवारपर्यंत 775.50 रुपये भरावे लागत होते. मात्र, हा दर 900.50 रुपयांवर पोहोचला आहे. नव्या दरवाढीनुसार उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांना 897.50 रुपये भरावे लागतील. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर आता 884.50 रुपये आहे, पूर्वी तो 859.50 रुपयांमध्ये विकला जात होता.
15 दिवसात 50 रुपयांची वाढ
15 दिवसात विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. तसेच 1 जुलैपासून सिलिंडरच्या किमतीत 75.50 रुपयांची वाढ झाली आहे. जुलैमध्ये सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली होती. तेल कंपन्यांनी एप्रिलमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली होती. त्याआधी फेब्रुवारी आणि मार्चमध्येही दर महाग झाले होते.
सात वर्षात दुप्पट वाढ
घरगुती एलपीजीची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत 410.50 रुपये प्रतिसिलिंडर (14.2 किलो) होती. हा दर आता सप्टेंबर 2021 मध्ये जवळपास 900 रुपयांवर पोहोचल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या सात वर्षात दुपटीहून अधिक वाढलेले दिसून येत आहेत.
क्यावसायिक सिलिंडरचाही भडका
घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक गॅस दरातही वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक (कमर्शियल) गॅसची किंमत 1,693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे.
पेट्रोल-डिझेल किमतीत कपातीचा दिलासा
दरम्यान, अनेक दिवस अपरिवर्तित राहिल्यानंतर बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 13-15 पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत आता 101.34 रुपये आणि मुंबईत 107.39 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत डिझेलची किंमत आता 88.77 रुपये आणि मुंबईत 96.33 रुपये प्रतिलिटर आहे.