ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 10 महिन्यांपासून बंद असलेल्या 10 राज्यातील शाळा आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि मेघालय राज्यात आजपासून सुरू होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या राज्यांमधील शाळा या वेगवेगळ्या इयत्तांनुसार सुरू होणार आहेत. तर काही राज्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंडळाने ऑक्टोबरमध्येच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याची परवानगी राज्यांना दिली होती. तसेच शाळा सुरू करण्यासाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली होती. यामध्ये शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी परवानगी आणणे आवश्यक होते. यासोबतच सर्दी, ताप असलेल्या विद्यार्थ्यांना आणि कन्टोनमेंट भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
यानंतर काही राज्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू केल्या मात्र, या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ एक ते दोन टक्के इतकीच दिसून आली. त्यामुळे आणि कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेत शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शाळा शाळा बंद केल्या. तर काही राज्यांनी अजूनही लसीकरण सुरू झाल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही असा निर्णय घेतला आहे.