गवाणे ग्रुप विविध कार्यकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तापली : शाब्दीक खडाजंगी, आरोप प्रत्यारोप,संस्थेला 69 हजार रुपयांचा निव्वळ नफा
वाळपई प्रतिनिधी.
गवाणे ग्रुप विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कारभारामध्ये मागील संचालक मंडळाच्या कारकर्दीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. यामुळे संस्थेची परिस्थिती बिकट झालेली आहे. मावळते चेअरमन कांता गावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संचालक मंडळावर फौजदारी खटले दाखल करावेत व झालेली रक्कम वसूल करून घेण्यात यावी अशी मागणी करणारा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. थकबाकी वसुली करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्यात यावीत. थकबाकी वसुलीसाठी टाळाटाळ करणाऱयावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी या सभेमध्ये करण्यात आली.
गवाणे ग्रुप विविध कार्यकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सभागृहामध्ये संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन मनोहर जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव विशाल देसाई, संस्थेचे संचालक रामनाथ गावडे, विष्णू गावकर,गंगाराम यमकर, नागेश गावकर, माली यमकर शुभांगी पानवेलकर यांची उपस्थिती होती.
गैरव्यवहारामुळे सभा तापली
सभेमध्ये मावळते चेअरमन कांता गावकर व विद्यमान चेअरमन मनोहर जोशी यांच्यामध्ये अनेक वेळा शाब्दीक खडाजंगी पाहायला मिळाली. कांता गावकर यांच्या अध्यक्षपदाखाली कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने संस्थेचे व्यवहारात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे. संस्थेच्या कागदपत्रात खाडाखोड करण्यात आलेली आहे. 2.65 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून याला सदर संचालक जबाबदार असल्याचा आरोप सभेमध्ये करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले मावळते चेअरमन कांता गावकर यांनी याला आक्षेप घेतला व आपण दोषी असल्यास सदर रक्कम भरण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. या गैरव्यवराची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सहकार अधिकारी सतीश सावंत यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक उपनिबंधक पंकज मराठे यांनी दोषीवर कारवाई करण्यात यावी व या संदर्भाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्यांची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी अशा प्रकारची मागणी यावेळी उपस्थित असलेले बाबली उर्फ दत्तात्रय नाईक अर्जुन राऊत, बिरो काळे ,प्रमोद जोशी यांनी केली. विद्यमान संचालक मंडळ आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करून संस्थेचे व्हाईस चेअरमन नागेश गावकर यांनी पदाचा व सभासद पदाचा राजीनामा सादर केला.
विद्यमान संचालक मंडळाला 2 लाख रुपयांचे खर्च करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्या पुढील खर्च करायचे असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सुरुवातीला संस्थेचे चेअरमन मनोहर जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. मागील वार्षिक सभेचा अहवाल संस्थेचे सचिव विशाल देसाई यांनी सादर केला.
यावेळी वेगवेगळय़ा विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने संस्थेचे सभासद भालचंद्र भावे, मनोहर जोशी, विष्णू गावकर, रामनाथ गावडे, बाळा? गावकर सगुण गावकर ,गोविंद गावकर, नारायण गावकर, विठोबा सावंत, दत्तात्रय नाईक, विश्वास गावकर, कांता गावकर, रोहिदास गावकर, अमर गावकर, विठोबा गावकर ,सदानंद जोशी, प्रमोद जोशी, नागेश गावकर विनोद जोशी, शर्मिला मनोहर जोशी, शुभांगी पानवेलकर, गंगाराम यमकर, बमो काळे, अविनाश जोशी, यांनी विशेष भाग घेतला.