दोनापावला येथे 22 पासून तीन प्रयोग : तब्बल 170 कलाकारांचा समावेश तांत्रिक बाजू सांभाळणार 60 जण
प्रतिनिधी /पणजी
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘गोंय.. एक जैत कथा’ या कोकणी महानाटय़ाचा प्रयोग सतत तीन दिवस म्हणजे दि. 22, 23 व 24 ऑक्टोबर रोजी दोनापावला – ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सायं. 6.30 वा. सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राजीव गांधी कला मंदिर, फोंडा निर्मित, माहिती आणि प्रसिद्धी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा महानाटय़ाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात युवा कलाकारांना कला सादर करण्यासाठी संधी प्राप्त करुन देण्यात आली असून एकूण 170 कलाकारांचा समावेश आहे. तांत्रिक बाजू सुमारे 50 ते 60 जण पडद्यामागून सांभाळणार आहेत.
गोमंतकाचा खरा इतिहास झळकणार
गोवा मुक्तीसाठी ज्या ज्ञात – अज्ञात वीरांनी, स्वातंत्रसेनानी, असंख्य नागरिकांनी अनेक हाल अपेष्टा सोसून, प्राणाची आहुती देऊन गोमंतभूमी परकीय जोखडातून स्वतंत्र केली त्या वीर पुत्रांचा परिचय आजच्या युवा पिढीला व्हावा, त्यांच्या त्यागाचे महत्व लोकांना कळावे व गोमंतकाचा खरा इतिहास लोकांना कळावा हा या समूह नाटय़निर्मितीचा प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
समूह नाटकातील वैशिष्टय़े
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी सहन केलेल्या यातना, पोर्तुगीजांची अमानुषता आणि गोमंतकीयांची सहनशीलता यांचे विदारक चित्रण, गोमंतकातील धर्मांतर स्वेच्छेने की जबरदस्तीने?, गोमंतकीयांनी आपला धर्म बदलला पण आपली संस्कृती बदलली नाही, गोवा मुक्तीसाठी शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे योगदान, गोमंतकीय लोककला, लोकगीते आणि लोकनृत्य यांचे आविष्कार, नाटय़, नृत्य आणि संगीताचा आगळा वेगळा अविष्कार या नाटकातून पाहायला मिळणार आहे.
गोमंतकाचे ज्येष्ठ साहित्यिक, नाटय़लेखक पुंडलिक नारायण नायक यांनी आजी – माजी ज्येष्ठ लेखकांच्या साहित्यातून मिळालेली माहिती घेऊन अभ्यासपूर्ण अशा ‘गोय.. एक जैत कथा’ नाटकाचे लेखन केले आहे. गोमंतकीय नामवंत दिग्दर्शक नीलेश महाले यांनी अनुभवी तांत्रिक कलाकारांना घेऊन या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचे पासेस सर्व रवींद्र भवनात प्राप्त होतील, असे मंत्री गावडे मंत्र्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मंत्री गोविंद गावडे यांच्या समवेत लेखक पुंडलिक नायक, दिग्दर्शक नीलेश महाले, सांखळी, फोंडा व मडगाव कला मंदिराचे पदाधिकारी स्वाती दळवी, श्रीकांत गावडे, व गिरीष वेळगेकर उपस्थित होते. श्रोत्यांनी कोविड नियमांचे पालन करुन नाटकाचा आनंद घेण्याचे आवाहन मंत्री गावडे यांनी केले आहे.