मार्च महिन्याच्या 7 पासून महाशिवरात्रोत्सवाला प्रारंभ : कोविडबाबत जागृती करणार
प्रतिनिधी / कारवार
मार्च महिन्याच्या 7 तारखेपासून जिल्हय़ातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण येथे सुरू होणाऱया महाशिवरात्री महोत्सव पूर्वतयारी बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भटकळचे असिस्टंट कमिशनर एम. अजीत होते. दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया संस्कृताचे प्रमुख अध्ययन केंद्र बनून राहिलेल्या पुराणप्रसिद्ध गोकर्ण येथील महाशिवरात्री उत्सवाला महत्त्वाचे स्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्रपदेश, तामिळनाडूसह अन्य राज्यातील श्रद्धाळू गोकर्ण येथे दाखल होतात, अलिकडच्या वर्षात विदेशी पर्यटकही गोकर्ण येथील शिवरात्रोत्सवात आवर्जुन सहभागी होतात. तथापि, यावर्षी कोरोना महामारीमुळे गोकर्णजवळच्या ओम, कुडले, हाफनून बीचवर विदेशी पर्यटक दाखल न झाल्यामुळे विदेशी पर्यटक महाशिवरात्रोत्सवात विशेष महारथोत्सवात सहभागी होण्याची शक्यता पुसट झाली आहे.
कोरोना महामारीमुळे दक्षिण कन्नड (मंगळूर) जिल्हय़ातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र कुवके सुब्रमण्यम देवालयाचा वार्षिकोत्सव केवळ जिल्हावासियांसाठी मर्यादित ठेवण्यात आला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या बाबतीत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. चर्चेनंतर गोकर्णमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने दाखल होणाऱया श्रद्धाळूंवर बंधन न घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
पथकांची रचना करून कोविडबाबत जागृती करणार
बैठकीवेळी कोविड महामारीसंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सूचना करण्यात आली. गोकर्ण ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या सरकारी खात्यातील कर्मचाऱयांचा समावेश असलेल्या चार पथकांची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पथके सर्वत्र फिरून कोविडबाबत जागृतीचे कार्य करणार आहेत. गोकर्ण येथे दाखल होणाऱया श्रद्धाळूंनी मास्कचा वापर करणे सक्तीचे असून मास्क न वापरणाऱयांच्याकडून दंड वसूल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
श्रद्धाळूंचे थर्मल स्क्रिनिंगचा प्रस्ताव
गोकर्णमध्ये दाखल होणाऱया प्रत्येक श्रद्धाळूचे थर्मल स्क्रिनिंग केले पाहिजे, असा प्रस्ताव उपस्थित केला असता बैठकीला उपस्थित असलेले कुमठा वैद्यकीय अधिकारी म्हणाले, उत्सवाला येणाऱया श्रद्धाळूंची संख्या मोठी असल्याने प्रत्येक श्रद्धाळूंचे स्क्रिनिंग करणे शक्य होणार नाही. मंदिरात प्रवेश करणाऱया प्रत्येक श्रद्धाळूचे स्क्रिनिंग या अगोदरपासूनच करण्यात येत आहे. आणि तीच पद्धत पुढे सुरू ठेवण्यात येईल.
मूलभूत सुविधांबद्दल चर्चा
शिवरात्रोत्सवाच्या कालावधीत पिण्याचे पाणी, पार्किंग, स्वच्छतागृह, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त आदी सुविधा चोखपणे उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. यात्रोत्सवावेळी रस्त्याच्या एका बाजूला दुकाने थाटणे आणि दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला गोकर्ण ग्रा. पं. अध्यक्ष मंजुनाथ जन्नू, उपाध्यक्षा शारदा मांडगी, कुमठा ता. पं. सदस्य महेश शेट्टी, कुमठा तहसीलदार मेघराज नाईक, कुमठा ता. पं. मुख्य कार्यदर्शी सी. टी. नाईक आदी उपस्थित होते.