उपनगराध्यक्षपदी बसवराज अरेन्नवर : दोन्ही निवडी बिनविरोध
वार्ताहर/ घटप्रभा
गोकाकच्या नगराध्यक्षपदी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गटाचे नगरसेवक जयानंद हुनश्याळ तर उपनगराध्यक्षपदी बसवराज अरेन्नवर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी शिवानंद बजंत्री यांनी केली. यामुळे प्रथमच गोकाक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
नगरपालिका निवडणूक झाल्यापासून दोन वर्षानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार अध्यक्षपदासाठी सामान्य वर्ग तर उपाध्यक्षपदासाठी परिशिष्ट जमाती असे आरक्षण आले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या गटातील वॉर्ड क्र. 15 चे नगरसेवक जयानंद हुनश्याळ यांनी अध्यक्षपदासाठी तर वॉर्ड क्र. 25 चे नगरसेवक बसवराज अरेन्नवर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरले. यावेळी विरोधी काँग्रेसच्या लखन जारकीहोळी गटाच्या 16 नगरसेवकांनी निवडणुकीपूर्वीच भाजपला पाठिंबा दिल्याने या दोघाहीजणांनी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर पालिका आयुक्त शिवानंद हिरेमठ यांच्यासह अधिकारी व कामगार वर्गाने नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.