वार्ताहर/ घटप्रभा
प्रेमप्रकरणात अडचण ठरणाऱया पतीचा खून करणाऱया पत्नीला प्रियकरासह अटक करण्यात आल्याची घटना गोकाक येथे घडली. संबंधीत पतीचा मृतदेह घटप्रभा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून हे प्रकरण घडले असून गोकाकचे डीवायएसपी डी. टी. प्रभू यांनी अटकेची कारवाई केली.
मृत पतीचे नाव आप्पण्णा उर्फ अप्पू संभाजी सनदी (वय 40 रा. गोकाक फॉल्स ता. गोकाक) असे आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी यल्लव्वा अप्पण्णा सनदी (वय 30) व तिचा प्रियकर विरुपाक्षी चंद्रय्या मठपती (वय 21) यांना अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रियकरासोबत यल्लव्वाचे अनैतिक संबंध होते. प्रेमप्रकरणात पतीची अडचण जाणवत असल्याचे लक्षात येताच पत्नी यल्लव्वाने आपल्या प्रियकरासह आप्पणा यांचा बिलकुंद्री गावात नेऊन खून करून नंतर दि. 24 मार्च रोजी मोटारसायकलवरून मृतदेह पोत्यातून जोकाट्टी येथे घटप्रभा नदी पात्रात टाकला. दि. 26 मार्च रोजी गोकाक शहर पोलीस ठाण्यात घटप्रभा नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह सापडल्याची नोंद झाली होती. डीवायएसपी डी. टी. प्रभू व सीपीआय गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. टी. अम्मीनभावी यांनी अधिक तपास केला असता वरील प्रकरणाचा उलगडा झाला. पतीच्या खून प्रकरणी पत्नी व प्रियकर या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना गोकाक जेएमएफसी कोर्टात हजर करण्यात आले.