क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील लीग क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनादिवशी गोकाक ग्लॅडिएटर्सने एजे स्पोर्ट्स बेळगावचा 9 गडय़ांनी तर एक्सेस इलाईट हुबळी संघाने सीसीआय ब्ल्यू संघाचा 70 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. अष्टपैलू खेळी केलेल्या सिद्धेश असलकर (गोकाक ग्लॅडिएटर्स), तनुष धुमाले (एक्सेस हुबळी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड फिल्म अभिनेता राज के. पुरोहित, संघटनेचे अध्यक्ष विक्रम देसाई, उपाध्यक्ष नागेश देसाई, सचिव परशराम पाटील, सहसचिव जयसिंह राजपूत, खजिनदार नासीर सनदी, प्रशांत लायंदर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूंची पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली.
पहिल्या सामन्यात एजे स्पोर्ट्स संघाने निर्धारित 22 षटकांत 8 बाद 108 धावा केल्या. त्यात गौरव काटनेने 29, जीत गदीयाने 28, अभिषेक निकमने 15, विनायक पांडेने 10 धावा केल्या. गोकाक ग्लॅडिएटर्सतर्फे शहाबाज जमखंडीने 32 धावात 2 तर सिद्धेश असलकर, नमन ओऊळकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गोकाक ग्लॅडिएटर्सने 15.1 षटकांत केवळ एक बळी गमवून 111 धावा जमवित 9 गडय़ांनी विजय मिळविला. कर्णधार सिद्धेश असलकरने 7 चौकारांसह नाबाद 51 धावा करून स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकविले. त्याला अनमोल पागदने 31, मुस्तफिज गोकाकने 15 धावा करीत चांगली साथ दिली.
सिद्धेश असलकर व अनमोल पागद या जोडीने पहिल्या गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी केली तर सिद्धेश व मुस्तफिज यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 43 धावांची भागिदारी केली. एजे स्पोर्ट्सतर्फे सोनन निलयारानीने एकमेव बळी मिळविला.
दुसऱया सामन्यात एक्सेस इलाईटने 25 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या. यष्टीरक्षक तनुष धुमालेने 1 षटकार, 6 चौकारांसह 39 चेंडूत नाबाद 55, ऋषभ पाटीलने 48, सात्विक सामंतने 13 धावा केल्या. सीसीए ब्ल्यूतर्फे सोहन कल्लूरने 30 धावात 2 तर भुवन बसडोनी, तनिष्क जैन, प्रतीक खराडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय ब्लू संघाचा डाव 24 षटकात सर्वबाद 91 धावात आटोपला. तनिष्क जैन व मयुरेश मंडलिकने प्रत्येकी 15, सोहन कल्लूर व भुवन बसडोनी यांनी प्रत्येकी 14 तर महंमद रियान बडेभाईने 13 धावा केल्या. एक्सेस इलाईटतर्फे साईनाथ राजोळीने 9 धावात 3, वेदांग बिडीकरने 12 धावात 2 तर मनिकांत बुकीटगार व आदित्य दानगण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सतीश पाटील, विनायक पवार, रूद्रण्णा चंदरगी, नागेश देसाई यांच्या हस्ते सिद्धेश असलकर तर दुसऱया सामन्यात बसवराज मागोटी, विजय कुलकर्णी, शिवानंद बुकीटगार, सुशांत नुली यांच्या हस्ते तनुष धुमाले यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुरूवारचे सामने – 1) एजे स्पोर्ट्स विरूद्ध आनंद अकादमी ड्रॉफिन वॉरियर्स, सकाळी 9.20 वा. 2) गोकाक ग्लॅडिएटर्स वि. देसाई वॉरियर्स, दुपारी 1.30 वा.