प्रतिनिधी / बेळगाव
नारीशक्ती व सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरेंद्र कुलकर्णी स्मृती खुल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोकाक ग्लॅडिएटर्स संघाने माळमारूती स्पोर्ट्स क्लबचा तर रॉजर सीसी संघाने बीसीसी मच्छे संघाचा पराभव केला. माजीद मकानदार (गोकाक), रघु गुट्टण्णावर (रॉजर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात गोकाक ग्लॅडिएटर्स संघाने 20 षटकात 8 बाद 184 धावा केल्या. माजी मकानदारने 6 षटकार, 6 चौकारासह 51 चेंडूत 83 धावा करून अर्धशतक झळकाविले तर सिद्धेश साळवीने 2 षटकार, 3 चौकारासह 34 धावा केल्या. माळमारूतीतर्फे राहुल बजंत्री व मुथ्थू यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल माळमारूती संघाचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 141 धावात आटोपला. विजय कुरीने 2 चौकारासह नाबाद 23 तर राहुल बजंत्रीने 2 चौकारासह 19 धावा केल्या. गोकाकतर्फे नेहाल तेरणी व हसन गोकाक यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात रॉजर क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 6 बाद 143 धावा केल्या. त्यात रघु गुट्टण्णावरने 2 षटकार, 5 चौकारासह नाबाद 52 तर आशिष मंडोळकरने 29 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे ध्रुव देसाईने 20 धावात 3 तर विजय पाटीलने 24 धावात दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बीसीसी मच्छेचा डाव 17.4 षटकात 103 धावात आटोपला. त्यात अर्णव नुगानट्टीने 6 चौकारासह 41 तर विजय पाटीलने 18 धावा केल्या. रॉजरतर्फे पार्थ पाटीलने 17 धावात 3, आशिष मंडोळकरने 20 धावात 2 तर विरेश जी.ने 13 धावात 2 गडी बाद केले.
मंगळवारचे सामने – सिग्नेचर वि. एमसीसीसी सकाळी 8.30, स्काय टच आनंद वि. माळमारूती दु. 12.30 वाजता.