क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील लीग क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोकाक ग्लॅडिएटर्स संघाने देसाई वॉरियर्स संघाचा 11 धावानी पराभव करून 3 गुण मिळविले. नाबाद 67 धावा व 1 गडी बाद करणाऱया कर्णधार सिद्धेश असलकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात येणारा पहिला सामना काल पावसामुळे खेळपट्टी ओली असल्याने रद्द करण्यात आला. दुसरा सामना देसाई वॉरियर्स वि. गोकाक ग्लॅडिएटर्स यांच्यात होता. या सामन्यात गोकाक ग्लॅडिएटर्सने 25 षटकांत 8 बाद 125 धावा केल्या. सिद्धेश असलकरने 6 चौकाराच्या मदतीने नाबाद 67 तर शहाबाज जमखंडीने 21 धावा केल्या. देसाई वॉरियर्सतर्फे आकाश कुलकर्णी, वैभव लोहार, अद्वैत शेटय़े, तेजस कडाडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना देसाई वॉरियर्सने 25 षटकात 8 बाद 114 धावा केल्या. आदित्य पाटीलने 23, वेदांत पाटीलने नाबाद 22 तर आकाश कुलकर्णी, लाभा वेर्णेकर यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. गोकाक ग्लॅडिएटर्सतर्फे शहाबाद जमखंडीने 10 धावात 3, हर्ष पटेलने 24 धावात 2, ओवेस निंबूवालेने 28 धावात 2 तर सिद्धेश असलकरने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुनील जाधव, श्रीधर वेर्णेकर, प्रकाश बेळगोजी, नासीर सनदी यांच्या हस्ते सिद्धेश असलकरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शुक्रवारचे सामने- एक्सेस इलाईट हुबळी वि. आनंद अकादमी ड्रीपइन वॉरियर्स, सकाळी 9.20 वा. 2) सीसीआय ब्ल्यू वि. देसाई वॉरियर्स, दुपारी 1.30 वा.