वार्ताहर/ घटप्रभा
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोकाक व मुडलगी या दोन्ही तालुक्यांमध्ये उद्या मंगळवारी रात्री 8 पासून पुढील 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
रविवारी दुपारी गोकाक तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित नगरसेवक, प्रशासनातील अधिकाऱयांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री जारकीहोळी म्हणाले, यापूर्वी तालुक्यामध्ये दुपारी 1 ते पहाटे 5 पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत होता. मात्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी. मंगळवारी रात्री 8 पासून पुढील 10 दिवसांपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येईल. अत्यावश्यक सेवांना यातून सूट देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुडलगीचे तहसीलदार डी. पी. महांत, डीएसपी मनोजकुमार, ता. पं. ईओ बसवराज हेग्गनाईक, पालिका आयुक्त शिवानंद हिरेमठ, सीपीआय गोपाल राठोड, रोटरी रक्तपेढीचे अध्यक्ष सोमशेखर मगदूम यांच्यासह अधिकारी, व्यापारी उपस्थित होते..