सीएए रद्द करण्याची मागणी : शहरातून निषेध रॅली
वार्ताहर/ घटप्रभा
एनआरसी व सीएएविरोधात गोकाक येथे बुधवारी मुस्लीम व दलित संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. सदर कायदा मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. बुधवारी गोकाक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
शहरातील विविध मुस्लीम तसेच दलित संघटनांच्यावतीने येथील बसवेश्वर सर्कलमध्ये एकत्र येऊन केंद्राच्या एनआरसी व सीएए धोरणाच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. भारतात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असताना केंद्र सरकार यामध्ये फूट पाडत असून सदर कायदे रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रकाश होळेप्पागोळ यांना देण्यात आले. यावेळी सत्याप्पा करेपाडे, रमेश मादर, लक्ष्मण तळगडे, अल्लाबक्ष मुल्ला, सुधा मुरकुंबी, गीता सन्नक्की यांच्यासह नागरिक उपस्थित होते.