324 कोटी प्रकल्प खर्च प्रस्ताव वार्षिक सभेसमोर ठेवणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळच्या वाशी येथील पॅकेजिंग स्टेशनचे अधुनिकीकरणासाठी 19 कोटी रुपयांची जागा खरेदी केली असून भोकरपाडा रायगड येथील 16 एकर जागा खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी संघाने 44 कोटी रक्कम गुंतवणुकीचे नियोजन केले आहे. भविष्यातील विक्री वाढीचा विचार करून ही गुंतवणुक केली आहे. या दोन्ही जागेसह विस्तारीकरणासाठी 324 कोटी खर्च अपेक्षीत आहे.
अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. ही गुंतवणूक संघ हिताच्या असल्याने शुक्रवार (दि.24) च्या वार्षिक सभेत मंजुरी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. विश्वास पाटील म्हणाले, अहवाल सालात दूध दर फरकापोटी 95 कोटी 58 लाख अदा केले आहेत. तर दिवाळीपूर्वी आणखी 83 कोटी 81 लाख रुपये देणार आहे. असे सांगत त्यांनी संघाच्या विस्तारीकरणाची माहिती दिली ते म्हणाले, मुंबईत विक्री वाढ झाल्याने पॅकिंगसाठी जागा अपुरी पडत होती.
शेजारील जागा व इमारत संघाने खरेदी केली. त्यासाठी स्वभांडवलातून 19 कोटी गुंतविली आहेत. या जागेवर आवश्यक ते बांधकाम व मशिनरीसाठी 19 कोटी लगाणार आहेत. त्याचबरोबर भोकरपाडा औद्योगिक वसाहतीतील 16 एकर जागा खरेदी करण्याचे नियोजन असून 44 कोटी लगाणार आहेत. येत्या काही वर्षात पॅकेजिंग स्टेशनच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे. या दोन्ही ठिकाणी स्वगुंतवणुकीतून 130 कोटी 40 लाख तर एनडीडीबीने पाच टक्के व्याजाने 193 कोटी 60 लाख कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
सध्या हा प्रस्तावित खर्च आहे. भविष्यातील तयारी म्हणून सभेसमोर हा विषय ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत दूध उत्पादक आणि संघाच्या हिताचे निर्णय घेतला आहे. संघाच्या प्रगतीसाठी प्रस्तावास सभेने मान्यता द्यावी असे आवाहन विश्वास पाटील यांनी केले. प्रकाश पाटील, शशीकांत पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, संभाजी पाटील, डी. व्ही. घाणेकर. उपस्थित होते.