सत्ताधाऱ्यांना पाठींबा देण्याबाबत राष्ट्रवादीमध्ये हालचाली
गोकुळ’निवडणुकीतून नवीन राजकीय समिकरणे होणार निश्चित, सत्ताधाऱ्यांमधील बंड तात्पुरते थंड
कोल्हापूर / कृष्णात चौगले
लोकसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमचं ठरलयं'चा नारा देत राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांना विरोध केला. त्याला काँग्रेसच्या बहुतांशी नेत्यांनी उघड तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी छुपा पाठींबा दिला. त्यामुळेच खासदार संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य मिळाले. पण या निवडणुकीच्या एका प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करून
म्या बी ध्यानात ठेवलयं’ अशा सूचक वक्तव्याद्वारे सतेज पाटील यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. त्याची प्रचिती आता गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीमध्ये येण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरु आहेत.
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले आहे.
15 फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार असून 12 मार्चला पक्की यादी तयार जाहीर केली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडÎात निवडणूक होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील यांनी गोकुळवर पुन्हा आपलेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार सर्वाधिक ठरावधारक असलेले बंडखोर संचालक अरुण डोंगळे व विश्वास पाटील यांची मनधरणी करण्यामध्ये त्यांना यश आले आहे. परिणामी गोकुळच्या राजकीय वाटचालीमध्ये पी.एन.पाटील निश्चित करतील ते धोरण मान्य केले जाईल, असे अभिवचन डोंगळे व पाटील यांनी दिले आहे. एकंदरीत गोकुळच्या सत्ताधाऱयांमधील धुसफूस संपुष्टात आली असून ते एकदिलाने आगामी निवडणुकीला सामोरे जातील असे प्रथमदर्शनी चित्र आहे.
`ये तो ट्रेलर है, फिक्चर अभी बाकी है’ असे म्हणणारे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आपल्या गटाच्या ठरावधारकांचा मेळावा घेतला. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात ते राष्ट्रवादीसोबत राहतील असे चित्र होते. पण श्रीपतरावदादा बँकेत झालेल्या बैठकीत डोंगळे यांनी पी.एन.पाटील यांचे नेतृत्व मान्य केले. म्हणजेच आगामी काळात माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पडद्याआड ठेवून पी.एन.पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान सध्या राष्ट्रवादीचे आमदार गोकुळचे विद्यमान संचालक राजेश पाटील, माजी आमदार के.पी.पाटील यांचे सत्ताधारी गटाकडेच झुकते माप आहे. हाच कित्ता जिल्हा नेतृत्वाकडूनही गिरवला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अस्तित्वासाठीच सत्ताधाऱयांना पाठींबा ?
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अस्तित्वशून्य झालेल्या काँग्रेसची धुरा पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आल्यापासून हात चिन्हावर जिह्यात सहा आमदार झाले आहेत. पक्षसंघटना बांधणीही मजबूत झाली. नुकतेच राष्ट्रवादीमधील काही नेते काँग्रेसच्या गोटात सामिल झाले. तर आणखी काही जण काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पालकमंत्री पाटील यांना साथ दिल्यास आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्यास पुन्हा काँग्रेसची ताकद वाढेल. साहजिकच राष्ट्रवादी हळूहळू कमजोर होईल, अशी भिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हा नेतृत्वास आहे. त्यापार्श्वभूमीवर सत्ताधाऱयांसोबत हातमिळवणी करण्यासाठी त्यांच्याकडून राजकीय चाल खेळली जाणार असल्याची चर्चा आहे.
गोकुळ, केडीसीसीचे राजकारण परस्परावलंबी
आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गोकुळ दुध संघाचे नेतृत्व करत आहेत. तर हसन मुश्रीफ यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व आहे. या दोन्ही संस्थांचे राजकारण परस्परावलंबी आहे. गोकुळच्या राजकारणात पी.एन. व महाडिक यांना मंत्री मुश्रीफ यांची साथ मोलाची ठरणार आहे. तर केडीसीसीच्या रणांगणात मुश्रीफांना पी.एन. व महाडिकांची ताकद मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळेच गोकुळ, के.डी.सी.सीच्या मंथनातून नवीन राजकीय समीकरणे निश्चित होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांचे मायक्रोप्लॅनिंग
गोकुळच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे मायक्रोप्लॅनिंग पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. सत्ताधाऱयांच्या कारभारावर बोट ठेवून त्यांना कोंडीत कसे पकडायचे याबाबत त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ बचाव कृती समितीमार्फत त्यांनी वेळोवेळी आंदोलने करून गोकुळच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीमध्ये त्याचा त्यांना फायदा होणार आहे. बदलणाऱया राजकीय घडामोडीनुसार खासदार संजय मंडलिक यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील आदींसह अन्य काही नेते विरोधी आघाडीला पाठींबा देतील, असे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबतच !
शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन गोकुळ दुध संघ मल्टिस्टेट करण्यासाठी विरोध केला. गोकुळच्या आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सत्ताधाऱयांशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा सुरु असली तरी ते आमच्यासोबतच राहणार असून सर्व लॉबी एकत्रितपणे काम करणार आहे. त्यामध्ये आणखी काही नेते सहभागी होणार असल्यामुळे सत्ताधाऱयांविरोधात भक्कम आघाडी तयार होईल, असा अंदाज खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.