प्रतिनिधी / कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन घेतलेल्या `गोकुळश्री’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. लक्ष्मी विकास सेवा संस्था गडहिंग्लजच्या म्हैस उत्पादक वंदना संजय जरळी यांच्या म्हैशीने एका दिवसात 19.540 लिटर दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला तर गाईमध्ये जनसेवा सहकारी दूध संस्था दूधगंगानगर कसबा सांगाव येथील उत्पादक किरण शांतिनाथ चौगले यांच्या गायीने 37.215 लिटर दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला. यंदाच्या स्पर्धेमध्ये 78 म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतला होता. यंदाचे स्पर्धेचे 28 वे वर्ष आहे.
गोकुळशी सलग्नग्न असणाऱया सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदां करीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत-जास्त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्यवसायकडे आकर्षित करून दूध व्यवसाय वाढविणे या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते.
या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी `गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसते. असे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे- म्हैस विभाग-
उत्पादक तालुका दूध लिटर क्रमांक बक्षिसरुपये
वंदना जरळी गडहिंगलज 19.540 प्रथम 25000
अमर पाटील चिखली, कागल 19.130 द्वितीय 20000
वंदना जरळी गडहिंगलज 19.010 तृतीय 15000
गाय विभाग-
उत्पादक तालुका दूध लिटर क्रमांक बक्षिसरुपये
किरण चौगले कसबा सांगाव 37.215 प्रथम 20000
अमोल मगदूम माणगांव, हातकणंगले 34.805 द्वितीय 15000
अनिकेत पाटील गांगोलींग भुदरगड 32.350 तृतीय 10000